रेशीम उद्योग व मधमाशी पालनामुळे उत्पादनात वाढ

By Admin | Published: March 27, 2016 02:12 AM2016-03-27T02:12:31+5:302016-03-27T02:12:31+5:30

रेशीम उद्योग हा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त व पूरक व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना मासिक उत्पन्न मिळण्याची हमी ...

Silk industry and honey bee cultivation increase productivity | रेशीम उद्योग व मधमाशी पालनामुळे उत्पादनात वाढ

रेशीम उद्योग व मधमाशी पालनामुळे उत्पादनात वाढ

googlenewsNext

एक दिवसीय कार्यशाळेतील सूर
वर्धा : रेशीम उद्योग हा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त व पूरक व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना मासिक उत्पन्न मिळण्याची हमी असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास योग्य पर्याय आहे. मधमाशी पालनामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी मदत होऊ शकते. मधमाशीद्वारे होणाऱ्या पराग सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनात दुपटीने वाढ होते. शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग व मधमाशी पालन हे व्यवसाय वरदान ठरणारे आहेत, असा सूर कार्यशाळेतील शेती, रेशीम व मधमाशी उद्योग तज्ज्ञांनी काढला.
रेशीम उद्योग आणि जैविक कीड व्यवस्थापन केंद्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर व स्थानिक यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकदिवसीय रेशीम उद्योग व मधमाशी पालन तंत्रज्ञान शेतकरी कार्यशाळा’ घेण्यात आली. रेशीम व मधमाशी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना याप्रसंगी मार्गदर्शन केले.
पहिल्या सत्रात ‘तुतीची लागवड व रोग नियंत्रण’ विषयावर बोलताना रेशीम उद्योग संचालनालयाचे प्रकल्प अधिकारी व्ही.पी. रायसिंग भंडारा यांनी रेशीम उद्योगातील उत्पन्न हे मासिक वेतनासारखे असून रेशमाच्या किड्यांची योग्य काळजी घेतल्यास हा व्यवसाय शेतकऱ्यांना मासिक ५० हजार रुपये मिंळवून देणारा आहे, असे सांगितले. रेशीम उद्योग संचालनालय उपसंचालक डॉ. एस.के. शर्मा म्हणाले की, शेतकऱ्यांनी रेशमाच्या किड्यांचे संगोपन करून कोष विकसित करण्यापूरते मर्यादित न राहता कोष प्रक्रिया उद्योगाकडे वळून आपल्या उत्पादनाचे मार्केटींग केल्यास त्याला अधिक फायदा होऊन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल.
द्वितीय सत्रात ‘मधमाशी पालन’ विषयावर मधमाशी विकास केंद्र नालवाडीचे संचालक डॉ. गोपाल पालीवाल यांनी पीपीटीद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतात आंतर पिके घेतल्यास मधमाशा मोठ्या संख्येने आकर्षित होतात व पराग सिंचनाचे कार्य अनेक पटीने वाढून पीक उत्पादनात वाढ होते. मधमाशी पालन व्यवसायाचे प्रशिक्षण प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावे. आपल्या शेतात मधमाशी पालन पेट्या लाऊन त्यांच्या वसाहती निर्माण कराव्यात, असे आवाहनही डॉ. पालिवाल यांनी केले.
‘पराग सिंचन’ विषयावर शिवाजी सायन्स कॉलेज पवनीचे प्रा.डॉ. बी. एस. रहिले यांनी स्वत:चे अनुभव कथन केले. श्रीकांत गजभिये यांच्या मदतीने अनेक शेतकऱ्यांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण देऊन अनेक मधमाशी वसाहती वसविल्या. असा प्रयोग वर्धा जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी नागपूर येथील सचिन करडभजने व त्यांच्या सहकाऱ्यांनी मधमाशी पालन व्यवसायाबाबत चित्रफित दाखवित मार्गदर्शन केले. खादीग्रामोद्योगचे गुढे यांनी मधमाशी पालन व्यवसायाबाबत विविध योजनांची माहिती दिली.
जिल्हा रेशीम उद्योग अधिकारी व्ही.एम. पौनीकर यांनी शासकीय योजनांबाबत माहिती दिली. दिल्ली येथील केजरीवाल ग्रामसंस्थानचे संचालक योगेश्वरसिंग यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. रेशीम उद्योग शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत रेशीम उद्योगतज्ज्ञ डॉ. एम.एम. राय यांनी वायफड येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन समस्यांचे प्रत्यक्ष निराकरण केले. दोन्ही सत्राला यशवंत ग्रामीण संस्थेचे उपाध्यक्ष सतीश राऊत, संचालक डॉ. किशोर अहेर, प्रतिभा निशाने, मनोहर निशाने, प्राचार्य डॉ. विलास देशमुख, शास्त्रज्ञ प्रा.डॉ. एम.के. राठोड, शेतकरी नेते विजय जावंधिया, बाबासाहेब साळवे, किशोर माथनकर उपस्थित होते. संचालन प्रा. प्रमोद नारायणे व प्रा. चंदनकर यांनी केले तर आभार डॉ. उत्तम पारेकर व डॉ. दिलीप भुगुल यांनी मानले. कार्यशाळेला प्रा. फागसे, प्रा. खान, प्रा. जयश्री काशीकर, प्रा. कावळे, प्रा. पुरुषोत्तम खोब्रागडे, डॉ. बैस आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Silk industry and honey bee cultivation increase productivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.