विदर्भाची लेक... हजारोंची माय, सिंधूताई सपकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 10:34 AM2022-01-05T10:34:12+5:302022-01-05T10:50:04+5:30
सिंधूताईचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे) येथे झाला. त्यांचे वडील अभिमान साठे हे गुराखी होते. तर त्यांचे सासर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या नवरगाव हे आहे.
वर्धा : अनाथांची माय म्हणून देशभरात ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांचे मंगळवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटविणाऱ्या माईंचा जन्म विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण विदर्भ हळहळला आहे.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात सिंधूताई सपकाळ यांचा वर्धा जिल्ह्याशी अंत्यंत जवळचा ऋणानुबंध राहिला आहे. सिंधूताईचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे) येथे झाला. त्यांचे वडील अभिमान साठे हे गुराखी होते. तर त्यांचे सासर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या नवरगाव हे आहे.
वयाच्या १० व्या वर्षी त्यांचा विवाह श्रीहरी सपकाळ यांच्यासोबत झाला. त्यानंतर त्यांनी पतीचे घर सोडले व त्यानंतर त्या अनेककाळ संघर्षमय जीवन जगल्या. वर्धा जिल्ह्यात त्यांनी गोपिका गाईरक्षण केंद्र व विविध सामाजिक संस्था सुरू केल्या. त्या माध्यमातून समाजातील शोषित पीडित नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे. अलिकडेच त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्याहस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यावेळी वर्धा वासियांच्यावतीने त्यांच्या विविध सामाजिक संघटनांनी सत्कारही केला.
मी वनवासी हे त्यांचे आत्मचरित्र गाजले होते. त्यावर आधारित चित्रपटही निघाला होता. चिखलदरा व्याघ्र प्रकल्पात गवळी लोकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आंदोलने केले. रामू पटेल हे वन राज्यमंत्री असताना त्यांना या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती. चिखलदऱ्याजवळील शहापूर येथे त्यांचे वास्तव्य होते. ममता बाल सदन, वर्धेतील गोशाळेच्या माध्यमातून त्यांचे कार्य अविरत सुरू होते. त्यांच्या मागे अमृत, अरुण, संजय, ममता ही मुले मुली आणि एक दत्तक मुलगा दीपक आणि अनाथांचा मोठा परिवार आहे.