सिंदी व सेलू कृउबासला संतांचे नाव मिळणार?
By admin | Published: September 10, 2015 02:43 AM2015-09-10T02:43:21+5:302015-09-10T02:43:21+5:30
तालुक्यातील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिंदी व सेलू येथील यार्डला संतांचे नाव देण्यात यावे, असा ठराव आमसभेत पारित केला होता. याला तीन वर्ष लोटले.
तीन वर्षांपूर्वीच ठराव पारित : सत्तारुढ संचालक मंडळाकडून अपेक्षा
सेलू : तालुक्यातील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिंदी व सेलू येथील यार्डला संतांचे नाव देण्यात यावे, असा ठराव आमसभेत पारित केला होता. याला तीन वर्ष लोटले. मात्र अद्याप यार्डाचे नामकरण झाले नाही. त्यामुळे नवीन संचालक मंडळाकडून या ठरावावर काय कार्यवाही होते याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
मुख्य बाजारपेठ असलेल्या सिंदी (रेल्वे) येथील यार्डला संत सखुआई तर उपबाजारपेठ असलेल्या सेलू येथील यार्डला संत केजाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, ठराव गत तीन वर्षांपूर्वी आमसभेत मांडला होता. सिंदी येथे झालेल्या संचालक मंडळाच्या आमसभेत ठराव पारित करण्यात आला. तत्कालीन सभापती व उपसभापती यांनी यार्डला संताचे नाव देण्यासाठी पुढाकार घेऊ, सभासद व तालुका वासीयांची ही मागणी पूर्ण करू असे सांगितले होते. आता नव्याने बाजार समितीच्या निवडणूका पार पडल्या. कृउबास सभापती उपसभापती यांची निवड प्रक्रिया झाली.
यानंतर यार्डला संतांचे नाव देण्यासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाकडून काय पावले उचलली जातात याकडे लक्ष लागले आहे. संचालक मंडळाच्या होणाऱ्या पहिल्या मासिक सभेत ठरावावर अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव मांडणार काय? याकडे लक्ष लागले आहे. यार्डला संताचे नाव देण्यासाठी तालुकावासीयांना अधिक प्रतीक्षा करावी लागणार काय हा प्रश्न कायम आहे. आमसभेत सर्वानुमते हा ठराव मंजूर झाला असून या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी नवनिर्वाचित संचालक काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.(शहर प्रतिनिधी)