पायाभूत चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेची एकच प्रत
By admin | Published: September 24, 2015 02:34 AM2015-09-24T02:34:17+5:302015-09-24T02:34:17+5:30
महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्यावतीने सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेण्याचा कार्यक्रम ३० सप्टेंबरपर्यंत आयोजित केलेला आहे.
इंग्रजी शाळा साशंक : पुणे विभाग म्हणतो, प्रश्नपत्रिकांचा पुरवठा केलेला आहे
वर्धा : महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्यावतीने सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेण्याचा कार्यक्रम ३० सप्टेंबरपर्यंत आयोजित केलेला आहे. यासाठी जिल्ह्यातील शिक्षण विभागाला प्रश्नपत्रिकांचा पुरवठाही करण्यात आल्याचे परिषदेने पत्रात म्हटले आहे. मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांना एकच प्रश्नपत्रिका पाठवून त्याची सत्यप्रत काढून ही चाचणी घेण्याच्या मौखिक सूचना स्थानिक शिक्षण विभागाने केल्यामुळे संबंधित शाळा या चाचणीबाबत साशंक आहे.
१८ सप्टेंबरच्या महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्या पत्रानुसार चाचणी घेण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नोत्तर पत्रिकांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. तसेच आणखी काही प्रश्नपत्रिकांची आवश्यकता असल्यास त्याप्रमाणे पोहच करण्याची व्यवस्था तत्काळ करण्यात येईल. यासोबतच सुलभ संदर्भासाठी पायाभूत चाचण्यांच्या प्रश्नोतर पत्रिकांची सॉफ्ट कॉपी ई - मेलद्वारे पाठविण्यात आली असल्याचेही पत्रात नमुद आहे. असे असतानाही वर्धा जिल्ह्यात शिक्षण विभागाने मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांना केवळ एकच प्रश्नपत्रिका पाठवून पायाभूत चाचणी घेण्याचे सूचित केले आहे. यामागे शिक्षण विभागाची भूमिका मात्र न समजणारी असल्याचा सूर या इंग्रजी शाळांमधून ऐकायला येत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
पायाभूत चाचणीमागील शासनाचा हेतू
राज्याबाहेरचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या अन्य बोर्डाच्या शाळांमधून (सीबीएसई, आयबीएसई व आयबी) पायाभूत चाचण्या घेतल्या जात नाही. यामुळे सरल प्रणालीमध्ये अशा विद्यार्थ्यांच्या नावासमोर ‘०’ गुण प्राप्त झाल्याचा आभास निर्माण होईल. हे राज्याच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या धोरणाशी विसंगत आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व बोर्डाचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळांमधून पायाभूत चाचणीचे आयोजन करण्यात आले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या योजनेमध्ये इंग्रजी माध्यमांच्या खासगी कायम विनाअनुदानित शाळांचाही अंतर्भाव केला. ही बाब महत्त्वाची आहे. मात्र या शाळांना एकच प्रश्नपत्रिका दिली आणि उर्वरित विद्यार्थ्यांसाठी त्याची सत्यप्रत काढण्याची मौखिक सूचना शिक्षण विभागाने दिली. ही बाब अन्यायकारक आहे. हा खर्च साधारणत: १५ ते २० हजार रुपयांच्या घरात जातो. याची कुठलीही तरतुद शाळेच्या अर्थसंकल्पात राहात नाही. अशा परिस्थितीत या चाचणी घेणे अडचणीचे दिसत आहे.
- मोहन राईकवार, जिल्हाध्यक्ष, मेस्टा वर्धा.