‘सिरो सर्वे’चा अहवाल अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 05:00 AM2020-09-12T05:00:00+5:302020-09-12T05:00:02+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यावर सुरूवातीला ५० दिवस जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री झाली नाही. पण सध्या दिवसेंदिवस कोविड बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याची कोविडची स्थिती काय याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या होकारानंतर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या सहकार्याने ऑगस्ट महिन्यात सुरूवातीला जिल्ह्यात सिरो सर्वे करण्यात आला.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा प्रशासनाकडून हिरवी झेंडी मिळाल्यावर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या सहकार्याने जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सिरो सर्वे’ करण्यात आला. या विशेष मोहिमेदरम्यान तब्बल २ हजार ४०० व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘सिरो सर्वे’चा अहवाल सध्या अंतिम टप्प्यात असून तो अधिकृतरित्या जिल्हाधिकारी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यावर सुरूवातीला ५० दिवस जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री झाली नाही. पण सध्या दिवसेंदिवस कोविड बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याची कोविडची स्थिती काय याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या होकारानंतर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या सहकार्याने ऑगस्ट महिन्यात सुरूवातीला जिल्ह्यात सिरो सर्वे करण्यात आला. या सर्वे दरम्यान समाजातील विविध स्तरातील २ हजार ४०० व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. या सर्व रक्तांच्या नमुन्यांचे विश्लेषण पूर्ण झाले आहेत. शिवाय अहवाल अंतीम टप्प्यात असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
‘अॅन्टिबॉडी’ विषयी मिळणार माहिती
लक्षणे नसलेली आणि लक्षणे असलेली कोविड बाधित जिल्ह्यात सापडत आहेत. अशातच काही कोविड बाधित कुठलाही औषधोपचार न घेता रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर बरीही होत आहेत. अशाच व्यक्तींची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात सिरो सर्वे करण्यात आला. या सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यावर सरासरी किती लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अॅन्टिबॉडी तयार झाल्या आहेत याची आरोग्य विभागाला मिळणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झाला निधी
जिल्ह्यात सिरो सर्वे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. शिवाय आरोग्य विभागाकडून काही मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले होते. असे असले तरी सध्या सिरो सर्वेच्या अहवालाची जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. लवकरच तो प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे.
बाळगली जातेय गुप्तता
आॅगस्ट महिन्यात सुरूवातीला जिल्ह्यात सिरो सर्वे करण्यात आला. सध्या त्याचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. नागरिकांमध्ये कुठल्याही परिस्थितीत संभ्रम निर्माण होऊ नये तसेच दहशत निर्माण होऊ नये म्हणून या अहवालाला पूर्णत्त्वास नेताना मोठी गुप्तता बाळगली जात आहे.
जिल्हा प्रशासनाकडून हिरवी झेंडी मिळाल्यावर जिल्ह्यात सिरो सर्वे करण्यात आला. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून निधी आणि काही मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले होते. सध्या सिरो सर्वेचा अहवाल आम्हाला मिळालेला नाही. लवकरच तो मिळेल अशी अपेक्षा आहे.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.
सेवाग्राम येथे झाले विश्लेषण
विशेष मोहिमेदरम्यान २ हजार ४०० व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन ते सिरो टेस्टसाठी सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. याच ठिकाणी या सर्व रक्ताच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सिरो सर्वेसाठी जिल्ह्यातील २ हजार ४०० व्यक्तींच्या रक्तांचे नमुने घेण्यात आले होते. त्याचे विश्लेषण सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत करण्यात आले. सिरो सर्वेचा अहवाल सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे.
- डॉ. सुबोध गुप्ता, वैद्यकीय अधिकारी, कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम.