शेतकऱ्यांची परिस्थिती शासन बदलविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:54 PM2018-09-09T23:54:23+5:302018-09-09T23:55:13+5:30
शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला सावरण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच प्रलंबित सिंचनाच्या योजना हाती घेवून न्यायाची भूमिका घेतली जात आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला सावरण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच प्रलंबित सिंचनाच्या योजना हाती घेवून न्यायाची भूमिका घेतली जात आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. स्थानिक मिरणनाथ पटांगणात आयोजित शहरातील ऐकमेव बैल पोळ्यांचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अतिथी म्हणून तहसीलदार प्रदीप वर्पे, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी बैलपोळ्यात उत्कृृष्ट ठरलेल्या पाच बैलजोडींचा खासदार तडस यांच्या हस्ते ट्रॉफी व रोख पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आला. बैलांचा रंग, शरीर बांधा, सजावट आदी बाबी लक्षात घेवून ही निवड करण्यात आली. प्रथम पुरस्कार विशाल आदमने, द्वितीय सचिन सुरकार, तृतीय गुलाब धोटे, चतुर्थ पिंटू खाडे व पाचवा पुरस्कार विठ्ठल लाडेकर यांचे बैलजोडींना देण्यात आला. शासकीय योजना कास्तकारांपर्यंत पोहचविण्यासाठी येथील तहसील कार्यालय कटीबद्ध आहे. बोंडअळीच्या अनुदानासाठी शासनाकडे चोवीस कोटींची मागणी करण्यात आली. यापैकी पहिला हप्ता पाच कोटीचा व दुसरा हप्ता साडेसात कोटीचा मिळाला. अनुदानाचे साडेतेरा कोटी रूपये कास्तकारांच्या खात्यात वळते करण्यात आले. उर्वरित पैसे लवकरच खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे तहसीलदार वर्पे यांनी सांगितले. प्रास्ताविक सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शरद आदमने यांनी केले. बैलपोळा उत्सवाचे आयोजन सेवा सहकारी सोसायटी व खा. तडस यांच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सोसायटीचे संचालक प्रकाश कारोटकर, संतोष मरघाडे, श्याम घोडे, श्रीकांत येनुरकर, वसंत तरास, सुनील पिपरे, सुरेश तायवाडे, संजय पारिसे, सचिव जे.पी. गोबाडे यांनी परिश्रम घेतले.