आॅटो-कंटेनरच्या भीषण अपघातात सहा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:34 PM2018-10-01T21:34:45+5:302018-10-01T21:37:01+5:30
येथील राष्ट्रीय महामार्ग सात वर येरला शिवारात वर्धा नदीच्या पुलाजवळ भरधाव कंटेनरने आॅटोला धडक दिली. यात आॅटोतील सहा जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट (वर्धा) : येथील राष्ट्रीय महामार्ग सात वर येरला शिवारात वर्धा नदीच्या पुलाजवळ भरधाव कंटेनरने आॅटोला धडक दिली. यात आॅटोतील सहा जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास झाला.
पोलीस सुत्रानुसार, एन. एल. ०१ ए.बी. ८०२१ क्रमांकाचा कंटेनर पांढरकवड्याच्या दिशेने जात होता. हा कंटेनर येरला फाटा नजीकच्या वर्धा नदीच्या पुलाजवळ आला असता त्याने एम.एच. २९ व्ही. ९११३ क्रमांकाच्या आॅटोला जबर धडक दिली. यात नितीन कंगाले (३०) रा. सोनेगाव (रा.), यमुना कंगाले (५५), हरिभाऊ ठमके (५८) रा. येरला, ज्ञानेश्वर रामाजी कुंभरे (५५) रा. सोनेगाव (रा.), श्रावण बापूराव आलाम (६५) रा. गांगापूर, वच्छला श्रावण आलाम (५५) रा. गांगापूर यांचा मृत्यू झाला. तर बंडु मडावी (५५) फुकटा, वच्छला बंडू मडावी (५०) रा. फुकटा, नानाजी पुरके (५०) रा. मानकापूर, जानराव कंगाले (६०) सोनेगाव हे गंभीर जखमी झाले. जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.
अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या मधोमध असल्याने व घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केल्याने या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या सुमारे तास परिश्रम घेत या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.