सहा कर्मचारी अडकले लिफ्टमध्ये
By admin | Published: January 24, 2017 02:22 AM2017-01-24T02:22:31+5:302017-01-24T02:22:31+5:30
हस्तांतरित न झालेल्या आणि लिफ्ट वापरू नये, अशी सूचना नसलेल्या लिफ्टमध्ये सहा कर्मचारी गेले. ते
जिल्हा परिषदेतील प्रकार : वेळीच मदत मिळाल्याने सर्व सुरक्षित
वर्धा : हस्तांतरित न झालेल्या आणि लिफ्ट वापरू नये, अशी सूचना नसलेल्या लिफ्टमध्ये सहा कर्मचारी गेले. ते तब्बल पाऊण तास लिफ्टमध्येच अडकले. यामुळे कर्मचाऱ्यांचे अवसान गळाले होते. मोबाईलवरून संपर्क झाल्यानंतर वेळीच मदत मिळाल्याने सर्व कर्मचारी सुखरूप बाहेर पडले. हा प्रकार सोमवारी जिल्हा परिषदेत घडला.
जिल्हा परिषद इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्यात आली आहे; पण ती अद्याप हस्तांतरित वा सुरू झालेली नाही. शिवाय तत्सम सूचना तेथे लावलेली नाही. यामुळे सोमवारी सामान्य प्रशासन विभागातील रमेश वानखेडे, अमोल राऊत, विशाल वानखेडे, अशोक कन्नाके, दीपक रोहाते, बबन नागरगोजे हे सहा कर्मचारी लिफ्टद्वारे तळमजल्यावरून वरच्या माळ्यावर गेले. दुपारी १.५० वाजता लिफ्टमध्ये गेलेले कर्मचारी तेथेच अडकून पडले. कर्मचाऱ्यांनी लिफ्टमधून बाहेर निघण्याचे प्रयत्न केले; पण त्यांना बाहेर निघता आले नाही. अखेर विशाल वानखेडे यांचा भ्रमणध्वनीवरून अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक संदीप विहिरकर यांच्याशी संपर्क झाला. यानंतर कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू झाली. या कर्मचाऱ्यांना तब्बल पाऊण तास लिफ्टमध्येच राहावे लागले. २.३७ वाजता त्यांना बाहेर काढण्यात आले. यासाठी लिफ्टचा एक भाग सबलीच्या साह्याने वाकविण्यात आला.
दरम्यान, हे कर्मचारी दुसऱ्या माळ्यावर गेले. तेथे विद्युत पुरवठा बंद झाला. कालांतराने विद्युत पुरवठा सुरू होताच लिफ्ट त्याच वेगाने आपोआप खाली आली. प्रवेशद्वार न उघडल्याने धावपळ उडाली. संबंधित कंत्राटदारही पोहोचले. त्यांनी चावीचा वापर करून लिफ्ट सुरू केली व कर्मचारी सुखरूप बाहेर पडले. सुरक्षित बाहेर पडल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला; पण दिवसभर याच घटनेची जिल्हा परिषदेमध्ये चर्चा होती.(कार्यालय प्रतिनिधी)
प्रमाणपत्र, फलकाचा अभाव
४लिफ्ट सुरू करण्याकरिता मुंबई येथील संबंधित विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे; पण अद्याप तसे प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. यामुळे लिफ्ट बंद असून रितसर लोकार्पणही करण्यात आले नाही; पण लिफ्टचा वापर करू नये, असा फलकही लावलेला नसल्याने कर्मचारी त्यात अडकले.