वर्धा प्रकरणाच्या चौकशीसाठी सहा सदस्यीय अभ्यास गट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 10:05 AM2022-01-18T10:05:35+5:302022-01-18T10:05:47+5:30
आरोग्य विभागाने उचलले पाऊल; संचालकांना सादर करणार अहवाल
- महेश सायखेडे
वर्धा : आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात - भ्रूणहत्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अखेर आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सोमवारी सहा सदस्यीय अभ्यास गट समिती स्थापन केली आहे.
नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी, सहायक संचालक डॉ. दिगंबर कानगुले, राज्य पीसीपीएनडीटीच्या अशासकीय सदस्य डॉ. आशा मिरगे, यूएनएफपीएचे सल्लागार डॉ. आसाराम खाडे व ॲड. वर्षा देशपांडे यांचा या अभ्यास गटात समावेश आहे. कदम हॉस्पिटलमध्ये झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल ही समिती थेट आरोग्य विभागाच्या संचालकांना सादर करणार आहे.
आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक यांनी आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहा सदस्यीय अभ्यास गट समिती नेमली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी आपण राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना केली होती. त्यानंतर ही समिती स्थापन करण्यात आली आहे, असे राज्याच्या पीसीपीएनडीटी सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.