हिंगणघाटात एकाच वेळी सहा ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा
By चैतन्य जोशी | Published: April 25, 2023 08:12 PM2023-04-25T20:12:59+5:302023-04-25T20:13:11+5:30
वर्धा पोलिसांची मोठी कारवाई : १४.३२ लाखांचा मुद्देमाल केला जप्त
वर्धा: हिंगणघाट शहरात सुरु असलेल्या सहा ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, क्राईम इंटेलिजन्स पथक आणि सायबर सेल पथकाने एकाचवेळी छापा टाकून लॅपटॉपसह जुगारातील इतर साहित्य असा एकूण तब्बल १४ लाख ३२ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत २७ जुगाऱ्यांना अटक केली.
ही कारवाई २५ रोजी रात्रीला करण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात ऑनलाईन जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या निर्देशान्वये पोलिसांची विविध सहा पथके तयार करुन हिंगणघाट शहरातील आठवडी बाजार, विर भगतसिंग वॉर्ड, श्रीराम टॉकीज रोड या परिसरात एकाच वेळी छापे मारण्यात आले. दरम्यान आरोपी हे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ६ दुकानांमध्ये वेगवेगळया कंपनीच्या जुगाराच्या मशीन्स लावून तसेच संगणकावर आणि लॅपटॉपवर इंटरनेट व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाईन जुगार व इतर प्रकारचे जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले.
पोलिसांनी सुमारे सहा दुकानातून ८ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या ४४ जुगार खेळण्याच्या मशीन्स, पाच संगणक, एक लॅपटॉप, विविध कंपनीचे ३ लाख १९ हजार रुपयांचे २३ मोबाईल, ५ प्रिंटर आणि ३१ हजार हजार ४७० रुपये रोख रक्कम आणि इतर साहित्य २२ हजार असा एकूण १४ लाख ३२ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या निर्देशात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, दिनेश बोथकर, विशाल मडावी, रोशन निंबोळकर, अनुप कावळे, सागर भोसले, राकेश इतवारे, मिथून जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, धिरज राठोड, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, प्रफुल्ल वानखेडे, स्मिता महाजन यांनी केली.
२७ जुगाऱ्यांना ठोकल्या बेड्या
पोलिसांनी ऑनलाईन पद्धतीने जुगार खेळणाऱ्या राष्ट्रपाल उद्धव भालशंकर, समीर शेख हाफीज शेख, शेख इम्राम शेख इब्राहीम, प्रफुल्ल राजू हेकने, शेख मोहसीन शेख रहीम, संजय सागर खडंतकर, विक्रांत दौलत वावरे, चेतन मोतीराम ढाले, नंदकुमार धनराज रामटेके, शेख राजीक शेख फिरोज, संदीप पद्माकर सरोदे, मुमेर इस्राईल खान, निरज शारदाप्रसाद पाराशर, गजानन रामकृष्ण पर्बत, रोशन सुरेश निमजे, सिद्धार्थ वसंता पथोड, रामा संजय भांडे, लखन बाबाराव कांबळे, शेख नसिम शेख शाबुद्दीन, शेख ताहीर शेख ईब्राहीम, प्रशांत पृथ्वीराज मेश्राम, दीपक अशोक रामटेके, सागर गणेश बैस, गुरुदयालसिंग गुरुबच्चनसिंग भादा, मंगेश सुरेश गुजर, अविनाश मारोतराव नंदागवळी सर्व रा. हिंगणघाट यांना अटक केली. तसेच आशिष पाराशर, धिरज पाराशर हे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.