शहरातील सहा पानठेले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:37 PM2018-07-23T22:37:30+5:302018-07-23T22:37:55+5:30
सुंगधीत तंबाखु व खर्रा यावर बंदी असताना त्याची विक्री केल्या जात असल्याचा ठपका ठेवून सोमवारी शहरातील सहा पानठेले सिल करण्यात आले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केली. यापूर्वी सदर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील दहा पानठेले सिल केले होते, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुंगधीत तंबाखु व खर्रा यावर बंदी असताना त्याची विक्री केल्या जात असल्याचा ठपका ठेवून सोमवारी शहरातील सहा पानठेले सिल करण्यात आले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केली. यापूर्वी सदर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील दहा पानठेले सिल केले होते, हे विशेष.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत तसेच अन्न सुरक्षा आयुक्त यांनी राजपत्राद्वारे सुगंधीत तंबाखु, स्वीट सुपारी, पान मसाला आदी अन्नपदार्थाची विक्री, निर्मिती, वितरण, साठवणूक यावर प्रतिबंध घातला आहे. सदर बंदीची प्रभावी अंमलबजावी या हेतूने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी सोमवारी ठिकठिकाणी छापा टाकून पाहणी केली. यावेळी काही पानठेल्यांवर बंदी असतानाही सुगंधीत तंबाखुपासून तयार करण्यात येणारा खर्रा खुलेआम विक्री केल्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने महिलाश्रम भागातील श्रद्धापर्ण पान सेंटर, सेवाग्राम पोलीस स्टेशन समोरील गुड्डू पान पॅलेस, सेवाग्राम भागातील मेघदुत लॉन परिसरातील जितेंद्र माने पान सेंटर, संजय पान मंदिर, संजय खडतकर याच्या मालकीचा महिलाश्रम भागातील पानठेला, महिलाश्रम येथील मुस्तफा पान सेंटर यांना सिल ठोकण्यात आले. शिवाय या पानठेल्यांमधून १,५०० रुपये किंमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त तथा पदावधित अधिकारी जी. बी. गोरे, ललीत सोयाम, रविराज धाबर्डे यांनी केली.
खर्रा व्यावसायिकांचे दणाणले धाबे
अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने केल्या जात असलेल्या कारवाईमुळे सध्या खर्रा व्यावसायिकांचे धाबे दणानले आहे. असे असले तरी कारवाई करणारे अधिकारी मोजक्याच व्यावसायांवर कारवाई करीत असल्याने त्यांच्या कारवाईबाबत सुजान नागरिकांकडून सध्या आश्चर्यच व्यक्त केले जात आहे.