दरोड्याच्या प्रयत्नातील सहा जणांना अटक
By admin | Published: December 4, 2015 02:14 AM2015-12-04T02:14:59+5:302015-12-04T02:14:59+5:30
सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरात संशयित रित्या फिरत असलेल्या सहा जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.
एमआडीसीतील घटना : धारदार शस्त्रासह बॅटरी, दोरी जप्त
वर्धा : सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरात संशयित रित्या फिरत असलेल्या सहा जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून धारदार शस्त्रासह दोरी, बॅटरी, रूमाल आदी साहित्य जप्त करण्यात आले. सदर सहाही जण दरोड्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
विष्णू कंजरभाट, दीपक वासनिक, राजेंद्र ठोंबरे, रामचंद्र नकवे, निलेश लोणारे, वैभव जाधव अशी अटकेत असलेल्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांच्यावतीने देण्यात आली आहे. या सहाही जणांना शहर ठाण्यात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
वर्धा शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे हे त्यांच्या पथाकासह रात्रगस्तीवर होते. त्यांचे पथक येथील औद्योगिक क्षेत्राच्या भागात गेले असता येथे काही युवक संशयीतरित्या फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून पळण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत त्यांना पकडले. त्यांनी झडती घेतली असता त्यांच्याकडून धारदार शस्त्र व इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्यांच्याकडे असलेल्या साहित्यावरून ते दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असावे, असा संशय पोलिसांचा आहे. अटकेत असलेल्या सहाही जणांवर भादंविच्या कलम ३९९, ४०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.(स्थानिक प्रतिनिधी)