वाहन लुटणारे सहा जण जेरबंद
By admin | Published: June 3, 2017 12:35 AM2017-06-03T00:35:46+5:302017-06-03T00:35:46+5:30
रस्त्याने जात असलेले वाहन अडवून चालकाला मारहाण करून साहित्यासह वाहन पळविणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली.
५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रस्त्याने जात असलेले वाहन अडवून चालकाला मारहाण करून साहित्यासह वाहन पळविणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली. ही घटना आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत धडली होती. अटक करण्यात आलेले सहाही आरोपी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील असून त्यांच्याकडून चोरीतील ५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाज जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री केली.
अब्दुल साजिद अब्दुल हबीब (३४) रा. गुजरी बाजार, मोहम्मद जावेद मोहम्मद रशीद (२९), मोहम्मद शफिक मोहम्मद रशीद (३५), इमरान खान शरफुद्दीन खान (३०) तिघेही रा. माळीपुरा, नसीम खान जाबाज खान (२२) व शेख वसीम शेख रहीम(२०) रा. इस्लामपुरा, मोर्शी लि. अमरावती अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस सुत्रानुसार, गणेश माहुलकर रा. चांदुर रेल्वे, जि. अमरावती हे त्यांच्या वाहनाने काही साहित्य घेवून जात असताना अनोळखी इसमांनी त्यांचे वाहन अडवून मारहाण करीत लुटमार केली. यात चोरट्यांनी रोख ३० हजार ५०० रुपये व एम.एच.२७ एक्स ७५४० क्रमांकाचे वाहन असा ३ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. याप्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला असता त्यांनी सहा जणांना संशीत म्हणून ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखविला असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन चारचाकी गाड्या, ९ मोबाईल, नगदी ३० हजार व गुन्ह्यातील चोरुन नेलेले साहित्य असा एकूण ५ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. व अपर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पराग पोटे, उपनिरीक्षक अचल मलकापुरे, पोलीस कर्मचारी परवेज खान, नरेंद्र डहाके, दिवाकर परिमळ, आनंद भस्मे, सचिन खैरकार, अमर लाखे, समीर कडवे, तुषार भुते, जगदीश डफ, मुकेश येल्ले यांनी केली.
मित्रानेच केला घात
या लुटमारीच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात याची माहिती उघड झाली आहे. या गुन्ह्यात असलेल्या आरोपींना फिर्यादीच्या मित्रानेच सूचना केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सूचनेरूनच पांढुर्णा येथून पाठलाग करून आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धाडी शिवारामध्ये लुटमार केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.