सहा व्यावसायिकांना ठोठावला २६ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 10:27 PM2018-08-02T22:27:10+5:302018-08-02T22:27:59+5:30
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना त्याचा वापर करताना आढळल्याने शहरातील सहा व्यावसायिकांवर न.प.च्या विशेष पथकाने दंडात्मक कारवाई केली. या व्यावसायिकांकडून एकूण २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना त्याचा वापर करताना आढळल्याने शहरातील सहा व्यावसायिकांवर न.प.च्या विशेष पथकाने दंडात्मक कारवाई केली. या व्यावसायिकांकडून एकूण २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी सध्या न.प.च्या आरोग्य विभागाकडून केली जात आहे. त्यासाठी न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष चमु तयार करण्यात आली आहे. या चमुने शहरातील न्यू डायमंड सेल, कृपा हॉटेल, कविता ट्रेडर्स, श्याम रेस्टॉरेंट, बिकानेर हॉटेल, चाट भंडार या व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकून तेथील स्वच्छतेची पाहणी करीत तेथे कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर होत आहे काय? याची शहानिशा केली. सदर व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने न्यू डायमंड सेल, कृपा हॉटेल, कविता ट्रेडर्स, श्याम रेस्टॉरेंट, बिकानेर हॉटेलच्या मालकाला प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला तसेच चाट भंडार या व्यावसायिक प्रतिष्ठानाला एक हजाराचा दंड असा एकूण २६ हजारांचा दंड ठोठावून त्याची वसूली केली. शिवाय या कारवाईदरम्यान न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुमारे ६० किलो कमी जाडीचे प्लास्टिक जप्त केले. ही कारवाई न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न.प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, आरोग्य विभाग प्रमुख प्रविण बोरकर यांच्या मार्गदर्शनात अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, सतीश पडोळे, नवीन गोंदेकर, गुरूदेव हटवार, स्रेहा मेश्राम, लंकेश गोंदेकर, मनिष मानकर यांनी केली.