वर्धेतील सहा मंदिरे केली जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:42 AM2017-12-01T00:42:12+5:302017-12-01T00:42:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधण्यात आलेली वर्धा शहरातील एकूण सहा मंदिरे गुरुवारी पालिकेने राबविलेल्या मोहिमेत जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे शासकीय जागेत मंदिरे बाधून जागा काबीज करणाºयांवर वचक बसला आहे.
स्थानिक नगरपालिकेच्या विशेष पथकाने आज शहरातील काही भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पालिका कर्मचाऱ्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधलेली मंदिरे तोडली. पालिकेच्या पथकाने आज दुपारपासून मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे व प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. प्रारंभी पालिका कर्मचाºयांनी आरती चौक भागातील शासकीय जागेवर असलेले मंदिर जमीनदोस्त केले. त्यानंतर पालिका कर्मचाºयांनी आपला मोर्चा शिवाजी चौक मार्गे गोंड प्लॉट परिसराकडे वळविला. त्यानंतर केळकरवाडी भागात शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले तीन मंदिर, गांधी नगर भागातील तीन मंदिर व आर्वी नाका भागातील एक मंदिर यावेळी तोडण्यात आले.
शहरातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या मंदिरावर न.प. च्यावतीने काही दिवसांपूर्वी नोटीस लावण्यात आले होते. त्यात नोटीसमध्ये मंदिर व्यवस्थापन समितीला काही सूचना पालिकेच्यावतीने करण्यात आल्या होत्या. त्या सूचनेकडे पाठ दाखविण्यात आल्याने अखरे आज पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
इतर अतिक्रमणांकडेही लक्ष देण्याची मागणी
वर्धा शहरात शासकीय जागेवर मंदिर बांधून त्याच्या आधारे अनेकांनी मोठी आणि मोक्याची जागा हडपल्याचे दिसून आले आहे. यात वर्धेतील मुख्य मार्ग असो वा इतर वॉर्डातील काही भाग असो, या मंदिराच्या आधाराने अनेकांचे अतिक्रमण आहे. पालिकेच्यावतीने आज आठ मंदिरे पाडण्यात आली. मंदिराच्या आधाराने असलेले अतिक्रमण उघडे करण्याकरिता पालिकेने या मंदिराकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.