वर्धा जिल्ह्यात सहा हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कमी पडण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 10:37 AM2020-06-04T10:37:32+5:302020-06-04T10:38:06+5:30
वर्धा जिल्ह्यात सहा हजार क्विंटल सोयाबीन कमी पडू शकेल अशी शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी व्यक्त केली आहे.
पुरुषोत्तम नागपूरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील वर्षी आर्वी उपविभागासह जिल्ह्यात १ लाख ७ हजार हेक्टर मध्ये सोयाबीन पेरणी झाली होती. यावर्षी एक लाख ३१ हजार पेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरणी होणार आहे. यावर्षी ८५००० क्विंटल सोयाबीन पेरणी करीता लागणार असून आतापर्यंत ४४ हजार क्विंटल सोयाबीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे सध्या स्थिती सहा हजार क्विंटल सोयाबीन कमी पडू शकेल अशी शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी व्यक्त केली आहे.
मागील वर्षी आर्वी तालुक्यात ९ हजार २६५ हेक्टरमध्ये सोयाबीन पेरणी झाली होती ती त्याच तुलनेत यावर्षी १२००० हेक्टरमध्ये होणार आहे. कारंजा तालुक्यात मागील वर्र्षी ११ हजार ३१० व यावर्षी १५,५०० हेक्टर तर आष्टी तालुक्यात मागील वर्षी ९ हजार २६५ तर यावर्षी ९६०० हेक्टर मध्ये सोयाबीन पेरणी होणार आहे.
सोयाबीन आणि कापूस हा पश्चिम विदर्भातील शेतीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पश्चिम विदर्भातील संत्रा पट्टा वगळता शेतीचे अर्थकारण या दोनच पिकावर अवलंबून आहे. मागील वर्षी शेतमालास मिळालेला भाव आणि या वर्षीचे पर्जन्यमान यांचा विचार करून शेतकरी या दोनच पिकाची पेरणी किती क्षेत्रावर करायची याचा निर्णय घेतात मागच्या वर्षीचा कापूस, सोयाबीन, चना व गहू अद्यापही शासनाने खरेदी सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. त्यातल्या त्यात कोरोना आणि लॉकडाऊन यांनी शेतकऱ्यांची कोंडी केल्यामुळे शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पेरणीकडे वाढण्याची शक्यता आहे. मात्र या वाढीव क्षेत्रात तर सोडा नेहमीच्या पेरणी करिता सोयाबीन बीज उपलब्ध करून देण्याचे गणित आर्वी उपविभागासह जिल्ह्यात बिघडण्याची शक्यता आहे. यावर्षी सोयाबीन बीज कमी पडणार असल्याने घरी असलेल्या सोयाबीन बीज उगवणशक्ती तपासून पेरणीकरिता आपल्याजवळ ठेवण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी घरील सोयाबीनची उगवन क्षमता तपासून ते तयार करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
मध्यप्रदेशातही गतवर्षी सोयाबीन खराब झाल्याने पुरवठा नाही
मागील वर्षी सोयाबीन काढताना अवकाळी पावसाने सर्व भागांमध्ये सोयाबीन खराब झाले. सोयाबीन बियाणे पुरवठा करणाऱ्या मध्यप्रदेशात सुद्धा सोयाबीन काढताना अनेक वेळा पाऊस झाल्याने तेथील बियाणे सुद्धा खराब झाले. त्यामुळे आवश्यक ते एवढे बियाणे जिल्ह्यात उपलब्ध होईल की नाही याबाबत शंकाच आहे. जिल्ह्यात यावर्षी एक लाख ३९ हजार हेक्टर सोयाबीन पेरणी होईल असा अंदाज आहे. जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी यांच्या नुसार वर्धा जिल्ह्यामध्ये एक लाख ३१ हजार सोयाबीन पेरणीचे नियोजन आहे. पेरणीसाठी ८५ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे व ४४ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे जिल्ह्यात पोहोचले आहे सहा हजार क्विंटल सोयाबीन पेरणीकरिता कमी पडू शकते.
यावर्षी जिल्ह्यात सोयाबीन पेरणीकरिता १ लाख ३१ हजार हेक्टर मध्ये सोयाबीन पेरणी होण्याची शक्यता आहे. त्याकरिता ८५००० क्विंटल पेरणीकरिता बियाणे लागणार आहे. त्यापैकी ४४ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे जिल्ह्यात पोहोचले आहे. उर्वरित बियाणे पोहोचणार आहे यामध्ये सहा हजार क्विंटल बियाणे कमी पडण्याची शक्यता आहे. जवळपास दरवर्षी २६ बीज कंपन्या बियाणे पुरवितात.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
महाबीजने मागील वर्षी १२००० क्विंटल सोयाबीन बीज पुरवले होते. यावर्षी सोयाबीन बीज पावसाच्या वारंवार येण्याने खराब झाले. त्यामुळे यावर्षी ५९०० क्विंटल सोयाबीन बीज पुरवणार आहे. त्यापैकी ४ हजार ९५९ क्विंटल बीज पुरवले आहे व ९४१ क्विंटल बीज काही दिवसातच पुरविणार आहे.
- अजय फुलझेले, महाबीज जिल्हा व्यवस्थापक वर्धा.