सहा गावांत मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:36 PM2018-05-18T23:36:49+5:302018-05-18T23:36:49+5:30

In the six villages, Chief Minister Saurakrishi Vahini | सहा गावांत मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी

सहा गावांत मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी

Next
ठळक मुद्देमहावितरणचे काम सुरू : शेतकऱ्यांना मिळणार १२ तास वीज

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून कृषी पंपांचा वापर होतो. यात शेतकऱ्यांना मोठ्या वीज देयकाचा सामना करावा लागतो. यातून शेतकऱ्यांची सुटका होण्याकरिता शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ही योजना राबविण्याची जबाबदारी खासगी संस्थेसह महावितरणला देण्यात आली आहे. आर्वी विभागातील सहा गावांत ही योजना कार्यान्वीत होणार आहे.
आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून शासन दरबारी नोंद असलेल्या वर्धेत शेतकऱ्यांच्या उत्थानाकरिता अनेक योजना राबविण्यात येत आहे. पण अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे योजना कुचकामी ठरत असल्याने आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. झालेल्या आत्महत्या सिंचनाच्या अत्यल्प प्रमाणामुळे होत असल्याचे कारण पुढे आल्याने कोरडवाहू असलेल्या या वर्धा जिल्ह्यात सिंचनाची सोय वाढविण्यात येत आहे. याच सिंचनाकरिता शासनाच्यावतीने विहिरी असलेल्या शेतकऱ्यांना कृषी पंप देण्यात आले आहे. मात्र त्याचा वापर करताना येत असलेल्या देयकाचा भार आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अधिक झाल्याने त्यांना दिलासा देण्याकरिता मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात महावितरणच्यावतीने आंजी, खरांगणा, विजयगोपाल, कारंजा, साहूर आणि पिंपळखुटा या गावांत ही वाहिनी सुरू होत आहे. तर काही गावांत खासगी संस्थेमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील या गावांत योजनेचे काम सुरू झाले आहे. आंजी येथे महावितरणच्या सबस्टेशनच्या शेजारी असलेल्या रिकाम्या जागेवर ही योजना सुरू करण्यात येत आहे. आंजीत योजनेच्या अंमलबजावणीकरिता सौर पॅनल लावण्याचे काम सुरू आहे. योजना पूर्णत्त्वास येताच या भागातील शेतकऱ्यांना दिवसाला १२ तास विज देणे शक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त विजभाराच्या भुर्दंडापासून बचाव होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना वेगळ्या फिडरवरून जोडणी
जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडून कृषी पंपाची मागणी करण्यात आली आहे. या मागणीपोटी आज स्थितीत ३,२३१ शेतकरी प्रतीक्षा यादीत आहे. शासनाच्या नव्या धोरणामुळे प्रतीक्षा यादीत असलेल्या शेतकऱ्यांना उच्च दाब वितरण प्रणालीतून जोडणी देण्यात येणार आहे. याकरिता दोन शेतकरी मिळून एक फिडर राहणार आहे.
या नव्या जोडणीनुसार २०१६-१७ मध्ये प्रतीक्षा यादीत असलेल्या ८२६ शेतकºयांना प्रथम लाभ मिळणार आहे. यातही प्रारंभी ४७५ शेतकऱ्यांची लॉटरी लागणार आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यात २०१५-१६ मधील २२ शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत. २०१७-१८ मध्ये २ हजार १२४ आणि २०१८-१९ मध्ये आतापर्यंत २५९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्वच शेतकºयांना शासनाने दिलेल्या सुचनेनुसार नव्या योजनेत जोडणी मिळणार आहे.
शासनाकडून सर्वेक्षण सुरू
या योजनेच्या अंमलबजावणीकरिता शासनाच्यावतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. हा सर्व्हे झाल्यानंतर योजनेच्या अंमलाकरिता लागणारा निधी मिळणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
नव्या पद्धतीमुळे वीज गळतीला ब्रेक
आतापर्यंत शेतकऱ्यांना दूर पर्यंत तारा टाकून कृषी पंपांना जोडणी दिल्या जात होती. यात अंतर अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात वीज गळती होत होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. नव्याने राबविण्यात येत असलेल्या एचव्हीडीएस (हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन सिस्टीम) मुळे या प्रकाराला आळा बसेल आणि अपघातही कमी होतील. शेतकऱ्यांच्या कृषी पंपात काही बिघाड आल्यास थेट सबस्टेशनवरून त्या पंपाचा पुरवठा बंद होणार असल्याने विजेच्या धक्क्याचे प्रमाण कमी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शासनाने शेतकऱ्यांना वाढत असलेल्या देयकांपासून मुक्ती देण्याकरिता नव्या योजना अंमलात आणल्या आहेत. यात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना आहे. ती महावितरणच्यावतीने जिल्ह्यातील सहा गावांत कार्यान्वीत होणार आहे. तर शेतकऱ्यांना योग्य वीज पुरवठा मिळावा याकरिता एचव्हीडीएस योजना कार्यान्वीत केली आहे. या दोन्ही योजना अल्पावधीत जिल्ह्यात सुरू होणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.
- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता,
महावितरण वर्धा.

Web Title: In the six villages, Chief Minister Saurakrishi Vahini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.