विद्यार्थ्यांनी बनविलेले आकाश कंदील बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:50 PM2017-10-14T23:50:31+5:302017-10-14T23:50:44+5:30
शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमांतर्गत विविध ध्येय दिले जाते. यात वर्धेतील जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळी सणानिमित्त विविध रंगी आकाश कंदिल निर्माण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमांतर्गत विविध ध्येय दिले जाते. यात वर्धेतील जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळी सणानिमित्त विविध रंगी आकाश कंदिल निर्माण केले. निर्माण केलेले आकाश कंदील शाळेतच न ठेवता विद्यार्थ्यांत व्यावसायिक गुण निर्माण करण्याच्या उद्देशाने ते बाजारात विक्रीकरिता आणत शाळेच्यावतीने नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
आजच्या शिक्षण प्रणालीत शालेय उपक्रमाचे महत्त्व जाणून कला शिक्षक आशिष पोहाणे यांनी विद्यार्थ्यांना प्रथम दोन-तीन दिवस आकाश कंदील निर्मितीचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात निपून झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांनी विविध आकाराची दिवाळीनिमित्त रंगीबेरंगी कागदापासून आकाश कंदील तयार करून घेतले. तयार केलेले आकाश कंदील शाळेत ठेवण्याऐवजी बाजारात विक्रीकरिता आणले. हे कंदील बाजारात असलेल्या कंदीलांपेक्षा अधिक आकर्षक असल्याचे दिसत आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी आपल्या घरच्यासाठी आकाश कंदील निर्मिती करता-करता त्यापासून विद्यार्थ्यांना चार पैसे मिळावे, असे शाळेचे मुख्याध्यापक के. डब्ल्यू. सोनटक्के व पर्यवेक्षक आर.आर. वाघमारे यांनी सुचविले.
विद्यार्थिनी सुंदर व आकर्षक आकाश कंदीलांची निर्मिती करून त्याचे गोपुरी चौक परिसरात एक दुकान थाटले. काही तासातच या विद्यार्थ्यांचे आकाश कंदील येणाºया जाणाºयांच्या पसंतीस पडले आणि ते विकले गेले. या उपक्रमाच्या निमित्ताने ग्रामीण भागतील विद्यार्थ्यांचा स्व-निर्मित अल्पदरात आकाश कंदील तयार करून विद्यार्थ्यांनी आनंद लुटत कमाई केली. या उपक्रमाकरिता अशोक डायगव्हाणे, धवणे व गोमासे यांचे सहकार्य लाभले.