स्लॅब लीक; संगणकाला प्लास्टिकचे संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:59 AM2017-09-04T00:59:42+5:302017-09-04T01:00:25+5:30
उप-डाकघर असलेल्या इमारतीचा स्लॅब लिक आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट संगणकांवर झिरपते. पाण्यामुळे संगणक खराब होऊ नये, कामात व्यत्यय येऊ नये म्हणून अनोखे जुगाड करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : उप-डाकघर असलेल्या इमारतीचा स्लॅब लिक आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट संगणकांवर झिरपते. पाण्यामुळे संगणक खराब होऊ नये, कामात व्यत्यय येऊ नये म्हणून अनोखे जुगाड करण्यात आले आहे. संगणक यंत्रणेच्या संरक्षणासाठी प्लास्टिकच्या छताचीच व्यवस्था करण्यात आली आहे. येथे येणाºया नागरिकांना हे दृश्य पाहून आश्चर्य झाल्याखेरीज राहत नाही.
आश्रम मार्गावर भारतीय डाक व तार कार्यालयाचे उप-डाकघर आहे. इमारत भव्य आणि सुसज्ज आहे. सर्व प्रकारची व्यवस्था असून आधुनिक आणि गतिमान कार्यासाठी संगणकीय व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सेवाग्राम आणि परिसरातील डाकघराचा कार्यालयीन व्यवहार तथा दवाखाना, महाविद्यालय, संस्था यांचा पसारा मोठा असल्याने महत्त्वपूर्ण देवाण-घेवाण या उप-डाकघरातून होत असते. या इमारतीचे भूमिपूजन आॅगस्ट १९७३ मध्ये झाले. कार्यालयातील संगणक यंत्राच्या वरील स्लबमधून पावसाळ्यात पाणी झिरपते. सर्व व्यवहार संगणकावरच होत असल्याने धोका होण्याची शक्यता होती. ही बाब टाळण्यासाठी चक्क त्यावर प्लास्टिकची झोपडीच करण्यात आले आहे. या माध्यमातून संगणक यंत्रणा आणि टेबलाचे संरक्षण करण्यात आले आहे.
या कार्यालयात दोन संगणक असून त्यांना प्लास्टिकचे कवच देण्याची वेळ कार्यालयावर आल्याचे दिसून येते. इमारतीचा स्लॅब लिक असल्याची बाब वरिष्ठांना कळविण्यात आली आहे; पण अद्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, तेथील कर्मचाºयांना जुगाड करीत संगणकाला संरक्षण द्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
अपघाताचाही धोका
उप-डाकघराच्या इमारतीचा स्लॅब लिक आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट संगणकावर झिरपते. यामुळे संगणक खराब होऊन कामे ठप्प होण्याची तथा रेकॉर्ड नष्ट होण्याचा धोका आहे. शिवाय संगणकावर पाणी पडून त्यात जिवंत वीज प्रवाहित होऊन अपघात होण्याचा धोका आहे. यामुळे ही बाब गंभीरतेने घेत दुरूस्ती करणे गरजेचे आहे.