मोबाईल टॉवरसाठी ३५ वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:15 AM2017-09-06T01:15:04+5:302017-09-06T01:15:22+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नजीकच्या पळसगाव येथील शाळा परिसरात लावण्यात आलेली रोपटी योग्य निगा घेतल्याने झपाट्याने मोठी झाली.

 Slaughter of 35 trees for mobile towers | मोबाईल टॉवरसाठी ३५ वृक्षांची कत्तल

मोबाईल टॉवरसाठी ३५ वृक्षांची कत्तल

Next
ठळक मुद्देपळसगाव येथील प्रकार : गावकºयांचा विरोध; कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नजीकच्या पळसगाव येथील शाळा परिसरात लावण्यात आलेली रोपटी योग्य निगा घेतल्याने झपाट्याने मोठी झाली. परंतु, विकासाचे नाव पुढे करीत चक्क एका नामवंत कंपनीच्या मोबाईल टॉवरसाठी येथील मोठी ३५ वृक्षांची कत्तल करण्यात आली. या प्रकारामुळे ग्रामस्थ संतापले असून सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपसरपंच रविंद्र चौधरी यांनी निवेदनातून केली आहे.
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समाजातील प्रत्येक स्तरातून पटवून दिल्या जात आहे. परंतु, विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातही वृक्ष कत्तल होत असल्याचे या घटनेमुळे पुढे आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष असलेल्या तेरा गावापैकी पळसगाव हे एक गाव आहे. या ठिकाणी ग्रामसेवक दुत म्हणून हेमंत जांबोदे यांची नियुक्ती करण्यात आली. जांबोदे यांनी विकास आढावा बैठक घेवून ग्रामस्थांची मते जाणून घेतली. शाळा परिसरात रिलायन्स जिओ टॉवर घेवू नये, असे सर्वानुमत ठरविण्यात आले. स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभेत या विषयावर मते जाणून घेतल्यानंतरच मोबाईल टॉवर उभारणीचे काम हाती घेण्यात येईल असे ठरविण्यात आले. परंतु ही बाब गावचे सरपंच रजनी ठाकरे, ग्रामसेवक कावळे व जिओचे टॉवर अधिकारी पुस्करे कुसरे यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी ग्रामसभेच्या आधी ४ आॅगस्टला शाळा परिसरात जेसीबीच्या सहाय्याने टॉवरकरिता खोदकाम सुरू केले. या टॉवरच्या कामात रोजगार हमी योजनेच्या १ लाख ९९ हजार ७१७ रुपयांच्या खर्चातून उभारलेले पाच वर्षांपूर्वी लावल्यानंतर चांगली मोठी झालेली ३५ झाडे तोडण्यात आली आहे. या झाडांनी प्राथमिक शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालय परिसर हिरवागार झाला होता. हा नयनरम्य परिसर सर्वांचे लक्षही वेधीत होता. टॉवरच्या बांधकामासाठी स्मशानभूमी जवळील जागा देण्यासाठी सर्वांची सहमती होती. परंतु, गावकºयांचे व गावातील निसर्ग प्रेमींचे मत न जाणून घेताच शाळा परिसरातील सर्व्हे क्रमांक २३४ आराजी १.२८ हे. आर या जागेची निवड करण्यात आली.
गावातील मोठी ३५ वृक्ष कत्तलीच्या प्रकरणात गावातील सरपंच, ग्रामसेवक तसेच मोबाईल कंपनीचे अधिकारी जबाबदार असून या प्रकरणाची सखोल चौकशी करीत दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून उपसरपंच रविंद्र चौधरी यांनी केली आहे.

Web Title:  Slaughter of 35 trees for mobile towers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.