खडकी-किन्हाळा रस्त्यावरील ४० झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:57 PM2018-07-22T23:57:47+5:302018-07-22T23:59:41+5:30
सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या हद्दीमधील खडकी-किन्हाळा-अंतोरा या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या हिरव्या उभ्या ४० बाभुळ लिलाव न करताच कापण्यात आल्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या हद्दीमधील खडकी-किन्हाळा-अंतोरा या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या हिरव्या उभ्या ४० बाभुळ लिलाव न करताच कापण्यात आल्या आहे. याप्रकरणी उपविभागीय अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष वाघ यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
खडकी-किन्हाळा रस्त्यावर अनेक वर्षांपासून डौलदार हिरव्याकंच बाभुळ होत्या. रस्त्याच्या दुतर्फा व बाभळीचे हिरवेगार नंदनवन बहरले होते. त्यापासून कुठलाही धोका नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी चार पाच लोक आले त्यांनी यंत्राच्या सहाय्याने मोठमोठ्या बाभुळ कापून वाहनाद्वारे भरून विल्हेवाट लावली. याची माहिती मिळताच स्वाभिमानीचे आशिष वाघ घटनास्थळी पोहचले. त्यांनी वृक्षकटाई करणाऱ्या मजूरांना विचारले असता त्यांनी उपविभागीय अभियंता विवेक पेंढे यांनी झाडे कापा अशी रेकॉर्डींग ऐकविली त्यामुळे वाघ चांगलेच अचंबित झाले.
लागलीच याप्रकरणी कार्यकारी अभियंता जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना चित्रीकरण व छायाचित्र पाठविले या रस्त्यावर काही बाभळीचा कापलेला माल पडून आहे.
गेल्या ३ वर्षांमध्ये आष्टी उपविभागात उपविभागीय अभियंत्याने रस्त्यावरील जवळपास सर्वच बाभुळ कापून नष्ट केला आहे. शासनाचेच अधिकारी शासनाला लाकूड तोडीच्या कामात चुना लावत असल्याने वृक्ष चोरट्यांचे फावल्या जात आहे. याप्रकरणी उपविभागीय अभियंता पेंढे यांना विचारले असता त्यांनी अज्ञात इसमाच्या नावे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे सांगितले. पोलिसांनी अद्यापही कुणावार कारवाई केली नाही. हे विशेष.