परवानगीचा अनर्थ काढून शेकडो झाडांची कत्तल
By Admin | Published: January 24, 2016 01:55 AM2016-01-24T01:55:46+5:302016-01-24T01:55:46+5:30
आर्वी ते पुलगाव मार्गावरील रोहणा ते सोरटा दरम्यान रहदारीला अडथळा होत असल्याच्या कारणावरून १६ बाभळीच्या ...
कंत्राटदाराचा प्रताप : बांधकाम विभागाने केले काम बंद
रोहणा : आर्वी ते पुलगाव मार्गावरील रोहणा ते सोरटा दरम्यान रहदारीला अडथळा होत असल्याच्या कारणावरून १६ बाभळीच्या झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी खासगी कंत्राटदाराला देण्यात आली; पण कंत्राटदाराने पत्रावर खोडतोड करीत ४६ नमूद केले. प्रत्यक्षात फांद्या कापण्याऐवजी शेकडो झाडांचीच सर्रास कत्तल करण्यात आली.
रोहणा ते सोरटा या १० किमी अंतराचा वनपरिक्षेत्र अधिकारी आर्वी यांनी सर्व्हे केला. यात रहदारीस अडथळा ठरणारी १६ झाडांच्या फांद्या तोडण्याची व त्याच्या मुल्यांकनाची माहिती सहा. अभियंता श्रेणी १, सार्वजनिक बांधकाम उपविभाग पुलगाव यांना १६ जानेवारी रोजी दिली. त्यानुसार बांधकाम विभागाने खासगी कंत्राटदाराला ९१ ते १५० गोताईची १५ तर १५० च्या वर गोताईचे १ झाड, असे बाभुळ जातीच्या १६ झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी दिली. यात कंत्राटदाराने चलाखी करून वनपरिक्षेत्र अधिकारी आर्वी यांनी दिलेल्या पत्रात खोडतोन करीत १६ चे ४६ केले. प्रत्यक्षात त्यांनी यापेक्षा कित्येक पट अधिक झाडेच तोडलीत.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावा झाडे जगवा, शतकोटी झाडे लागवड योजना, एक मूल एक झाड या योजना राबवून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जंगल व झाडे संवर्धनाचा शासनाचा धडक कार्यक्रम असताना खासगी कंत्राटदार आर्थिक स्वार्थासाठी सर्रास झाडांची कत्तल करीत आहे. यावर ज्यांनी नियंत्रण ठेवावे, अशी शासनाची अपेक्षा आहे, त्यांचे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग पुलगाव यांनी १६ झाडांची परवानगी दिली असून कंत्राटदाराने तेवढीच झाडे तोडावी, यावर लक्ष ठेवणारी सश्रम यंत्रणा असणे गरजेचे आहे; पण खासगी कंत्राटदारावर लक्ष नसल्याने त्यांचे फावत आहे. यातून शासनाच्या योजनांना सुरूंग लागत आहे.(वार्ताहर)