वनविभागाच्या जागेवरील डेरेदार सागांची कत्तल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 09:54 PM2022-11-11T21:54:54+5:302022-11-11T21:55:20+5:30

पारडी दक्षिण बिटातील सर्वे क्रं. ६८ झुडपी जंगल माैजा पारडीमध्ये दिवसाढवळ्या  मोठ्या प्रमाणावर सागवानाची अवैधरित्या तोड करण्यात आली. लाकूड तस्कर अन् वनविभागाच्या अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याने तसेच वनविभागाच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळेच हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देणारा वनविभाग लाकूड तस्करांना समर्पित तर झाला नाही ना, असा प्रश्नही वृक्षप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

Slaughter of Deredar Sagas on the site of the Forest Department! | वनविभागाच्या जागेवरील डेरेदार सागांची कत्तल!

वनविभागाच्या जागेवरील डेरेदार सागांची कत्तल!

googlenewsNext

प्रमोद भोजणे
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : विविध प्रजातींच्या वनसंपदेने नटलेल्या तळेगाव वनपरिक्षेत्रात सध्या अवैध वृक्ष कत्तलीला उधाणच आले आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणांमुळे मौल्यवान समजल्या जाणारी साग प्रजातींची डेरेदार झाडे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांकडून भुईसपाटच केली जात आहेत.
विशेष म्हणजे म्हणजे पारडी (हेटी) भागातील वनविभागाच्या जागेवरील डेरेदार सागाच्या झाडांची भरदिवसा तोड करण्यात आली; पण तळेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी उंटावरून शेळ्या हाकलण्यात धन्यता मानत असल्याने त्यांच्या कार्यप्रणाली विषयी परिसरातील वृक्षप्रेमींकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 
तळेगांव वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र पारडी नियतक्षेत्र पारडी दक्षिण बिटातील सर्वे क्रं. ६८ झुडपी जंगल माैजा पारडीमध्ये दिवसाढवळ्या  मोठ्या प्रमाणावर सागवानाची अवैधरित्या तोड करण्यात आली. लाकूड तस्कर अन् वनविभागाच्या अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याने तसेच वनविभागाच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळेच हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देणारा वनविभाग लाकूड तस्करांना समर्पित तर झाला नाही ना, असा प्रश्नही वृक्षप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

नाममात्र कारवाई करून अधिकाऱ्यांकडून थोपटून घेतली जातेय पाठ
- तळेगांव वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र पारडी नियतक्षेत्र पारडी दक्षिण बिटातील सर्वे क्रं. ६८ झुडपी जंगल माैजा पारडी  येथील अवैध वृक्षतोड करून साठवणूक करण्यात आलेला ३ मीटर २६१ घनमीटर साग लाकूड जप्त करण्यात आला आहे. ज्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करून डेरेदार सागाची चोरी करण्यात आली त्याच्या तुलनेत ही कारवाई नाममात्रच ठरणारी आहे; पण कारवाई करून तळेगावचे अधिकारी स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. जप्त करण्यात आलेला लाकूड एक लाख रुपये किमतीचा असल्याचे सांगण्यात आले.

साधे सर्वेक्षणही नाही
- वनविभागाच्या जागेवरील डेरेदार सागाच्या वृक्षांची मनमर्जीने तोड करण्यात आली असली तरी तळेगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून साधे सर्वेक्षणही करण्यात आलेले नाही. अधिकारी मूग गिळून असल्याने जिल्हा स्थळावरील बड्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष देत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आहे.

३ नोव्हेंबरला तळेगाव वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र पारडी नियतक्षेत्र पारडी दक्षिण बिटातील सर्व्हे क्र. ६८ झुडपी जंगल माैजा पारडीमध्ये अवैध सागवान झाडाची कटाई झाल्याचे दिसून आले. त्याबाबत शोध घेतला असता  शेजारील कुलदीप सीरस्कार यांनी मालकी खसरा खरेदी करून साग झाडाची कटाई केली. संबंधित लाकडात अवैध तोडलेला लाकूड मिसळून वाहतूक करणार असल्याच्या तयारीत असताना आरोपीस पकडून अवैध कटाई केलेला माल जप्त केला आहे. शिवाय आरोपीविरुद्ध वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
- विजय सूर्यवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी, तळेगाव (श्या.पंत.).

 

Web Title: Slaughter of Deredar Sagas on the site of the Forest Department!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.