बोपापूर परिसरात वृक्षांची कत्तल
By admin | Published: April 2, 2016 02:40 AM2016-04-02T02:40:35+5:302016-04-02T02:40:35+5:30
नजिकच्या बोपापूर येथील शासकीय आणि वनविभागाची मालकी असलेल्या जमिनीवरील झाडांची राजरोसपणे कत्तल सुरू आहे.
वनविभागाचे दुर्लक्ष : अनेक शेतकऱ्यांनी केले अतिक्रमण
पोहणा : नजिकच्या बोपापूर येथील शासकीय आणि वनविभागाची मालकी असलेल्या जमिनीवरील झाडांची राजरोसपणे कत्तल सुरू आहे. जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही होत आहे. त्यामुळे निसर्गाचे दोहन होत आहे. ४० एकर शासकीय जमिंनीची कागदोपत्री नोंद तेवढी बाकी आहे.
बोपापूर गावालगतच सरकारी मालकीची १५.४५ हेक्टर जमीन आहे. त्यापैकी वनविभागाला ८.५५ हेक्टर जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. सदर जमिनीवर गेल्या काही वर्षापर्यंत वनराई फुललेली दिसत होती. परंतु महसूल विभाग आणि वनविभागाच्या दुर्लक्षतेमुळे या जमिनीवरील मोठ-मोठ्या वृक्षांची कत्तल करून अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून जमीन ताब्यात घेतली आहे.
गावालगतच या जमिनीच्या मध्यभागातून एक नाला गेला आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बोपापूर गावाची निवड झाल्याने सध्या या नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे आपल्या सोयीप्रमाणे नाल्याला अनेक ठिकाणी वळणे देवून नाल्यापर्यंत शेतजमिनीवर अतिक्रमण वाढत चालले आहे.
वास्तविक पाहता महसूल आणि वनविभागाने आपल्या मालकीची जमीन ताब्यात घेणे गरजेचे होते. परंतु महसूल व वनविभाग अनभिज्ञ असल्याने जवळ-जवळ ४० एकर जमीन असताना सुद्धा ती अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे.
एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा नारा देत वृक्षलागडीकडे विशेष भर आहे. परंतु वनविभागाकडे मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध असताना सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या जमिनीची मोजणी करून वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)