रस्ता रूंदीकरणात वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 10:24 PM2018-01-25T22:24:35+5:302018-01-25T22:25:13+5:30

राज्य शासनाने सध्या रस्ते विकासावर भर दिला आहे. बहुतांश रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात असून रस्ते रूंद केले जात आहेत. हे सिमेंटचे जंगल उभे करण्यासाठी लाखमोलाच्या वृक्षांची मात्र सर्रास कत्तल केली जात आहे. तेवढी झाडे लावली तर ठीक; पण त्याकडेही कंत्राटदार दुर्लक्ष करतात.

Slaughter of trees in road width | रस्ता रूंदीकरणात वृक्षांची कत्तल

रस्ता रूंदीकरणात वृक्षांची कत्तल

googlenewsNext
ठळक मुद्देसेवाग्राम ते मांडगाव मार्गावरील प्रकार : वर्धा ते देवळी रस्त्यासह शहरातही वृक्षतोड

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य शासनाने सध्या रस्ते विकासावर भर दिला आहे. बहुतांश रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात असून रस्ते रूंद केले जात आहेत. हे सिमेंटचे जंगल उभे करण्यासाठी लाखमोलाच्या वृक्षांची मात्र सर्रास कत्तल केली जात आहे. तेवढी झाडे लावली तर ठीक; पण त्याकडेही कंत्राटदार दुर्लक्ष करतात. परिणामी, मार्ग भकास होत आहेत. याकडे लक्ष देत कंत्राटदारांकडून तोडलेल्या झाडांच्या दुप्पट-तिप्पट झाडे लावून घेणे गरजेचे झाले आहे.
जिल्ह्यात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. वर्धा शहरात बॅचलर रोड, बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सेवाग्राम ते मांडगाव व वर्धा ते यवतमाळ या मार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. हे करीत असताना रस्त्याच्या कडेला कित्येक वर्षांपासून असलेले वृक्ष सर्रास कापली जात आहेत. यामुळे हे मार्ग भकास होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता मागील काही वर्षांपासून शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे; पण त्याची फलश्रूती होत नसल्याचेच दिसून येत आहे. एकीकडे वृक्ष लागवड करायची आणि तीच झाडे विकासाच्या नावावर सर्रास कापायची, असा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू आहे. सेवाग्राम ते मांडगाव मार्गावर शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. आता रस्त्याच्या दुतर्फा किती वृक्ष लावले जातील की त्याकडे दुर्लक्ष केले जाईल, हे वेळच सांगणार आहे. असे असले तरी वृक्षतोडीमुळे सध्यातरी रस्ते भकास झाले असून पर्यावरणाची हानी झाली आहे.
वृक्षतोडीतूनही कंत्राटदार करतात कमाई
रस्ते विकासाची कामे सुरू असताना शेकडो झाडे कापली जातात. वास्तविक, सदर वृक्ष शासनाची मालमत्ता असते; पण बहुतांश ठिकाणी कंत्राटदारच यातून कमाई करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. रस्ता रूंदीकरणाचे काम घेतलेले कंत्राटदार रस्त्याच्या बाजूची झाडे कापण्याकरिता अन्य कंत्राटदाराला कंत्राट देतात. यात शासनाला महसूल बुडविला जात असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.
शिवाय लाकूड चोरही यात हात साफ करीत असल्याचे दिसून येत आहे. सेलू तालुक्यात अनेक ठिकाणी सर्रास वृक्षतोड केली जात आहे. देवळी मार्गावरही वृक्षतोड करण्यात आली आहे. शहरातील रस्ता रूंदीकरणासाठीही लाखमोलाची झाडे कापली गेली. यामुळे सर्वत्र सिमेंटचे जंगल निर्माण होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी, पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता प्रत्येक मार्गावर वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Slaughter of trees in road width

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.