वर्धा पालिकेकडून वृक्षांची कत्तल

By admin | Published: September 5, 2015 02:00 AM2015-09-05T02:00:14+5:302015-09-05T02:00:14+5:30

सर्वत्र पर्यावरणाच्या रक्षणाकरिता विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. याकरिता वृक्षलागवड करण्याच्या सूचना आहेत.

Slaughter of trees from Wardha Municipal | वर्धा पालिकेकडून वृक्षांची कत्तल

वर्धा पालिकेकडून वृक्षांची कत्तल

Next

बाजार परिसरातील जुनी झाडे तोडली : वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचे कारण
वर्धा : सर्वत्र पर्यावरणाच्या रक्षणाकरिता विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. याकरिता वृक्षलागवड करण्याच्या सूचना आहेत. वर्धेत मात्र पालिकेच्यावतीने या वृक्षलागवडीकरिता कुठलेही विशेष प्रयत्न होत नसताना केवळ वृक्षतोड करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. पालिकेच्यावतीने शुक्रवारी शहरातील टिळक मार्केट परिसरातील असलेली जुनी मोठी वृक्षे तोडण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले असल्याचे चित्र होते.
येथील बाजार परिसरात गत अनेक वर्षांपासून मोठी झाडे आहेत. या झाडांमुळे बाजारात सावली राहत असून या सावलीच्या आधाराने अनेक छोटे मोठे व्यापारी आपला व्यवसाय चालवित असतात. या झाडाखाली हातबंडी वाल्यांसह अनेक जण व्यवसाय करीत होते. बाजार परिसरातील ही झाडे त्यांच्याकरिता त्यांची दुकाने झाली होती. अशात वर्धा पालिकेच्यावतीने आज ती झाडे अचानक तोडण्याचा सपाटा सुरू केल्याचे दिसून आले आहे. पालिकेच्यावतीने होत असलेल्या या वृक्षतोडीमुळे हिरवा असलेला बाजार परिसर ओसाड झाल्याचे चित्र दिसत होते.
पालिकेच्या प्रभाक क्रमांक ७ चा भाग येत असलेल्या परिसरातील ही मोठी वृक्ष बाजार येणाऱ्या जाणाऱ्यांना सावली देण्याचे काम करीत होती. कधी उन्हाच्या तर कधी पावसाच्या सपाट्यात सापडलेल्यांना आधार देण्याचे काम या झाडांनी केले आहेत. टिळक मार्केट परिसरात असलेल्या एका कडुलिंबाच्या झाडावर पिंपळाचे झाड उगविले होते. त्या झाडांच्या पसरलेल्या शाखा अनेकांना सावली देणाऱ्या ठरत होते.
अनेक फेरीवाल्यांसह रस्त्याच्या कडेला पोत्यावर दुकान लावून आपला उदनिर्वाह करणाऱ्यांकरिता महत्त्वाचे असलेले हे झाडा पालिकेच्यावतीने वाहतुकीच्या कारणाने तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोठी वृक्षे तोडण्याकरिता पालिका प्रशासनाच्यावतीने सर्वसाधारण सभेत ठराव घेतल्याचेही सांगण्यात आले आहे. यातूनच ही वृक्षतोड करण्यात आल्याची माहिती आहे. पालिकेच्यावतीने सुरू असलेली ही वृक्षतोड वाहतुकीच्या नाही तर कुण्या एका व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून पालिकेच्या कुण्या नगरसेवकाने केल्याची चर्चा परिसरात होती. वृक्षकटाई सुरू असताना या प्रभागाचा एकही नगरसेवक येथे उपस्थित नव्हता. केवळ पालिकेचे न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरीया हेच तिथे दिसून आले. यामुळे कदाचित या वृक्षतोडीच्या निर्णयात त्यांचाच मोलाचा वाटा असावा, अशी चर्चा या परिसरात होती. त्यांना विचारणा केली असता केवळ झाडाच्या वाढलेल्या फांद्याची कटाई करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. ही वृक्षतोड सुरू असताना येथील काही व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. मात्र वृत्त लिहिस्तोवर कुणीही या विरोधात पोलीस ठाण्यात गेले नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पालिकेच्यावतीने राबविण्यात आलेल्या या वृक्षतोडीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र होते.(प्रतिनिधी)
आर्थिक व्यवहारातून कटाई ?
वर्धेतील टिळक मार्केट परिसरात असलेल्या जुन्या वृक्षांची शुक्रवारी कत्तल करण्यात आली. वृक्षांची कटाई ही वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या कारणाने करण्यात आल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात येत आहे. मात्र परिसरात ही कटाई पालिका प्रशासन व काही व्यापाऱ्यांत झालेल्या आर्थिक व्यवहारामुळे झाल्याची चर्चा येथे जोरात होती.
या वृक्षांच्या परिसरात परिसरात असलेल्या काही व्ययवसायिकांच्या दुकानाचे फलक या झाडांच्या फांद्यामुळे झाकोळल्याचे दिसून आले. झाडांच्या फांद्यांमुळे त्या दुकानाची ओळख पटत नव्हती. यामुळे या व्यावसायिकाने पालिकेच्या कुण्या एका पदाधिकाऱ्याला हाताशी धरून आर्थिक व्यवहार करून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
वृक्ष कटाईचा निर्णय घेताना पालिकेच्यावतीने बाजार परिसरात असलेली ही झाडे तोडताना त्यामुळे होणाऱ्या अडचणीचा विचार करण्याची गरज व्यक्त होती. या झाडाच्या आधाराने बऱ्याच छोट्या व्यवसायिकांचा उदरनिर्वाह सुरू असल्याच्या प्रतिक्रीया येथील व्यापाऱ्यांनी दिल्या आहेत.
व्यावसायिकांकडून होत आहे अतिक्रमण
बाजार परिसरात व्यावसायिकांकडून अतिक्रमण होत आहे. शिवाय येथील काही व्यापाऱ्यांनी या मोठ्या झाडांचा आधार घेत बाजारातील ही जागा त्यांच्याच मालकीची असल्याचा तोरा मिरविणे सुरू केले होते. शिवाय ही झाडे रस्त्याच्या कडेला असल्याचे दिसत असले तरी वास्तविकतेत ती रस्त्याच्या मधोमध असल्याचे दिसून आले आहे. या झाडांमुळे सावली मिळत असून त्याच्या खाली अनेक छोटे व्यवसायी आपला व्यवसाय करीत असल्याचे दिसून आले. मात्र येथे व्यवसाय करताना त्यांना येथील काही व्यापाऱ्यांकडून त्रास होत असल्याचे दिसून आले. याच्या तक्रारी आल्याने पालिकेच्यावतीने सर्वसाधारण सभेत ही झाडे तोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
- कमल कुलधरीया, न.प. उपाध्यक्ष, वर्धा
वृक्ष लागवडीबाबत कधीच ठराव नाही
पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने शासनाच्यावतीने विविध उपाय आखण्यात येत आहेत. यात वृक्षलागवडीला महत्त्व देण्यात आले आहे. असे असताना शहरात हिरवळ निर्माण करण्यासंदर्भात पालिकेच्यावतीने कुठलाही ठराव घेण्यात आला नाही तर कधी वृक्षारोपण करण्यात आले नसल्याची माहिती आहे.
वृक्षलागवडीला पाठ दाखविणाऱ्या वर्धा पालिकेच्यावतीने मात्र वृक्षतोड जोरात सुरू आहे. गत चार दिवसांपूर्वी ठाकरे मार्केट परिसरात असलेली झाडे पालिकेच्यावतीने तोडण्यात आली आहे. त्याची कुठली परवानगी घेतली अथवा नाही या संदर्भात पालिकेत माहिती नाही. येथील दोन मोठी कडूनिंब व एक बाभळीचे झाड तोडण्यात आले. तोडण्यात आलेल्या झाडांची खोडे नेमकी कुठे गेली याचही पत्ता नाही.
शहरात तोडण्यात येत असलेल्या या झाडांपासून मिळणारी लाकडे येथील स्मशानघाटात देण्यात असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे. असे असले तरी होणारी वृक्षांची कत्तल निसर्गाचा ऱ्हास करणारी आहे.

Web Title: Slaughter of trees from Wardha Municipal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.