परवानगी न घेता टॉवरसाठी शेतातील झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:07 PM2018-01-21T22:07:01+5:302018-01-21T22:07:11+5:30
विद्युत लाईनच्या टॉवरमुळे शेताचे नुकसान होत आहे. अत्यल्प मोबदला देत शेती खराब करण्याचे काम तालुक्यात सर्रास सुरू आहे. दिघी बोपापूर येथील फुलमाळी यांच्या शेतातही परवानगी न घेता टॉवर उभारले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : विद्युत लाईनच्या टॉवरमुळे शेताचे नुकसान होत आहे. अत्यल्प मोबदला देत शेती खराब करण्याचे काम तालुक्यात सर्रास सुरू आहे. दिघी बोपापूर येथील फुलमाळी यांच्या शेतातही परवानगी न घेता टॉवर उभारले जात आहे. यासाठी शेतातील झाडांचीही कत्तल केली आहे. याकडे लक्ष देत कंत्राटदारावर कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनही देण्यात आले आहे.
दिघी बोपापूर येथील भीमराव फुलमाळी यांची शेती त्यांचा भाऊ दिलीप यांच्या नावे आहे. शेत सर्व्हे क्र. ११० आराजी ३.६४ हे आर. वर्ग १ या शेताची उत्तर-दक्षिण विभागणी करून तोंडी वाटणी झाली. यात अंदाजे ३ एकर शेत भीमराव फुलमाळी हे वाहत आहे. सदर शेतात तूर असून शेंगा लागून आहेत. इलेक्ट्रीक टावर लाईन कंपनीने शेतकऱ्याला पूर्वसूचना न देता तथा परवानगी न घेता सदर शेतातून टावर लाईनचे काम सुरू केले आहे. यासाठी १० डिसेंबर २०१७ रोजी शेतातील अंदाजे ३० ते ४० सागाची झाडे, ३ ते ४ बोरीची झाडे, तीन ते चार गोंदणीचे झाडे बुडापासून अवैधरित्या कापलीत. शिवाय अर्ध्या एकरातील पीक नष्ट झाले. यात शेतकऱ्याचे सुमारे तीन ते पाच लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. शेतात काही तार उभे केले असून काही तार उभे करणार आहेत. यासाठी आणखी काही झाडे मनमानीपणे तोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कापलेली झाडे व तूर पिकाचे नुकसान शेताची पाहणी केल्यास लक्षात येऊ शकते. याचा पंचनामा करून प्रत शेतकऱ्याला मिळणे गरजेचे आहे. वनविभागाने तलाठ्याच्या माध्यमातून पंचनाम करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्याने केली. कंपनीने कायदा हातात घेत परवानगी न घेता झाडे तोडून नुकसान केल्याने कार्यवाही करावी, अशी मागणीही भीमराव फुलमाळी या शेतकºयाने केली आहे.