झोपेची डुलकी ठरली अपघातास कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 05:00 AM2022-01-01T05:00:00+5:302022-01-01T05:00:22+5:30
या अपघातात ट्रक चालक केबिनमध्ये दबल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून जेसीबीच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकेल्या वाहन चालकाला बाहेर काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : नागपूरकडून जामच्या दिशेने जात असलेल्या भरधाव ट्रकच्या चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना वाहन उलटले. यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात नागपूर-हैद्राबाद मार्गावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झाला.
प्राप्त माहितीनुसार, टी.एन. ८८ एच. २४५१ क्रमांकाचा ट्रक नागपूरकडून जामच्या दिशेने जात होता. दरम्यान, ट्रक चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना वाहन थेट उलटले.
या अपघातात ट्रक चालक केबिनमध्ये दबल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून जेसीबीच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकेल्या वाहन चालकाला बाहेर काढले.
शिवाय त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे. या घटनेमुळे सदर मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.