काचांवर झोपून नोंदविला न.प. प्रशासनाचा निषेध
By admin | Published: June 19, 2017 01:12 AM2017-06-19T01:12:30+5:302017-06-19T01:12:30+5:30
येथील नगर पालिकेने विशेष मोहीम हाती घेत शहरातील विविध भागातील अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली आहे.
नुकसान भरपाईची मागणी : छोट्या व्यावसायिकाचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील नगर पालिकेने विशेष मोहीम हाती घेत शहरातील विविध भागातील अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली आहे. सदर कार्यवाहीला विरोध नसून कार्यवाहीच्या नावाखाली छोट्या व्यावसायिकांच्या दुकानांची तोडफोड केली जात आहे. अनेक छोट्या व्यावसायिकांचे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी अल्पोहाराची टपरी लावणाऱ्या विल्सन मोखाडे याने स्थानिक बजाज चौकात अनोखे आंदोलन सुरू केले आहे.
सदर आंदोलनादरम्यान विल्सन मोखाडे याने काचांवर झोपून न.प.च्या छोट्या व्यावसायिक विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. आंदोलनादरम्यान शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनातून, रस्त्याच्या कडेला छोटी टपरी लावून विविध प्रकारचे व्यवसाय करणारे गरीब असतात. ते कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायातून करतात. आपणही टपरी लावून चायनिज खाद्य पदार्थ विक्रीच्या व्यवसायातून कुटुंबाचा गाढा ओढतो. सध्या न. प. प्रशासनातर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेला विरोध नाही. परंतु, विशेष मोहिमेच्या नावाखाली नगर पालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी छोट्या व्यावसायिकांच्या दुकानांची तोडफोड करीत आहेत. आपल्या दुकानाचीही तोडफोड करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आपल्यासह नुकसानग्रस्त अन्य छोट्या व्यावसायिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी किंवा त्यांच्या तोडफोड करण्यात आलेल्या दुकानांची तात्काळ दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आंदोलनस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.