शिवारभर दरवळतो देशी दारूचा गंध
By admin | Published: August 15, 2016 01:04 AM2016-08-15T01:04:17+5:302016-08-15T01:04:17+5:30
पावसाने उघाड दिल्याने बळीराजा कपाशी व सोयाबीन पिकाला फवारणी करीत आहे.
कीटकनाशक म्हणून कपाशी व सोयाबीन पिकांसाठी गुणकारी असल्याचा विश्वास
आकोली : पावसाने उघाड दिल्याने बळीराजा कपाशी व सोयाबीन पिकाला फवारणी करीत आहे. परंतु महागडी कीटकनाशके वापरण्यापेक्षा फवारणीकरिता देशी दारू आणि शितपेयाचा वापर केला जात आहे. त्यामुळे शिवारभर दारूचा गंध दरवळत आहे.
रासायनिक खते व कीटकनाशकांचे दर गगणाला भिदले आहे. भाववाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सतत महिनाभर पावसाने हजेरी लावल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सध्या फवारणीची कामे सुरू आहे. यात काही शेतकऱ्यांनी कमी खर्चात फवारणी करण्याकरिता देशी दारूमध्ये शीतपेय टाकून फवारणी सुरू केली आहे. कपाशीवर हा प्रयोगा जास्त प्रमाणात होत आहे.
दारूमुळे पिकांमध्ये हार्मोन्स तयार होवून फुलोरा चांगला येतो. तसेच झाडांची सपाट्याने वाढ कपाशीला जास्त प्रमाणात बोंडे धरतात, सोयाबीनला गुच्छेदार शेंगा येतात असे शेतकरी सांगत आहेत. त्याचप्रकारे शीतपेय कीटकनाशकाचे काम करीत असल्याचेही शेतकरी सांगतात.
गत काही वर्षापासून शेतकरी हा प्रयोग करीत आहे. कृषी विभागाने यावर संशोधन केल्यास शेतकरी अधिकृतपणे देशी दारू खरेदी करून फवारणी करू शकतील असेही सांगण्यात येत आहे. असे असले तरी दारूची फावारणी करताना ती किती झाडाला आणि किती पोटात जाते हाही संशोधनाचा विषय आहे. त्यामुळेच शिवारांमध्ये देशी दारूचा गंध दरवळतो.(वार्ताहर)