सुगंधित तंबाखू केला नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 09:39 PM2019-05-20T21:39:00+5:302019-05-20T21:39:16+5:30
अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत अन्न व औषध प्रशासन वर्धा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कारवाई करून जप्त केलेला सुगंधीत तंबाखू, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित अन्नपदार्थ सोमवारी इंझापूर येथील डंपिंग यार्ड परिसरात नष्ट केला. सदर मुद्देमाल तब्बल चार लाखांचा आहे. यावेळी पंचासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत अन्न व औषध प्रशासन वर्धा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कारवाई करून जप्त केलेला सुगंधीत तंबाखू, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित अन्नपदार्थ सोमवारी इंझापूर येथील डंपिंग यार्ड परिसरात नष्ट केला. सदर मुद्देमाल तब्बल चार लाखांचा आहे. यावेळी पंचासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
अन्न व औषध प्रशासनाने २०१२ पासून सुगंधित तंबाखू, पानमसाला, गुटखा व खर्रा इत्यादी अन्न पदार्थांवर जनआरोग्याच्या दृष्टीने विक्री, साठवणूक, वितरण व निर्मितीवर प्रतिबंध घातला आहे. असे असतानाही चोरट्या पद्धतीने वर्धा जिल्ह्यात सुगंधित तंबाखू आणि पानमसाला आदी प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्री तसेच साठवणूक होत असल्याच्या माहितीवरून वेळोवेळी छापा टाकून कारवाई केली. स्थानिक स्वागत कॉलनी येथील पप्पू मधुकर बाकडे व तेथीलच मुकेश अशोक वसु तसेच मे. श्रीकृपा प्रोव्हजन, गणपती वॉर्ड आर्वी, राजेश किशनचंद चैनाणी यांच्या घरातून, हनुमान वॉर्ड सिंधी कॅम्प आर्वी तसेच वर्धा जिल्ह्यातील विविध पान ठेल्यांविरुद्ध कारवाई करुन हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्याची किंमत ४ लाख १९ हजार ३७५ रुपयांच्या घरात आहे. या जप्त साठ्याबाबत सहायक आयुक्त (अन्न) वर्धा यांना प्रकरण सादर करण्यात आले. त्यावर त्यांनी सदर साठा प्रतिबंधित असल्याने नष्ट करण्याचे आदेश निर्गमित केले. त्यावरून ही कार्यवाही करण्यात आली. यावेळी व्अशोक ठाकूर, ललित सोयाम, रविराज धाबर्डे आदी उपस्थित होते.