देवळी तालुक्यातूनच सामाजिक व राजकीय धडे मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:38 PM2018-02-14T22:38:30+5:302018-02-14T22:38:50+5:30
तालुक्यातील सोनेगाव (आबाजी) या गावातून माझे व्यक्तिमत्व विकसीत झाले. वडिलोपार्जित गाव म्हणून माझ्या लहान मनावर संस्कार झाले. सामाजिक व राजकीय धडे येथेच आपल्याला मिळाले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम पर्यटन,......
ऑनलाईन लोकमत
देवळी : तालुक्यातील सोनेगाव (आबाजी) या गावातून माझे व्यक्तिमत्व विकसीत झाले. वडिलोपार्जित गाव म्हणून माझ्या लहान मनावर संस्कार झाले. सामाजिक व राजकीय धडे येथेच आपल्याला मिळाले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम पर्यटन, औषध व सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी केले.
नजीकच्या सोनेगाव आबाजी येथील धर्मार्थ दवाखाना व रूग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, आ. डॉ. पंकज भोयर, जि. प. शिक्षण सभापती जयश्री गफाट, पं. स. सभापती विद्या भुजाडे, जि. प. सदस्य वैशाली येरावार, भाजपाचे संपर्क प्रमुख राहुल चोपडा व महामंत्री सुनील गफाट यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने शेतकºयांच्या हितार्थ अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सामान्य नागरिकांच्या आरोग्याचे भान ठेवून गरजु रूग्णांच्या उपचारासाठी पाच लाखापर्यंतची शासकीय मदत देवून सामाजिक दायित्वाची भावना जोपासली जात आहे, असेही यावेळी ना. येरावार यांनी सांगितले.
खासदार तडस यांनी अध्यक्षीय भाषणात येरावार कुटंूबियांचा सामाजिक वारसा तसेच सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती याप्रसंगी दिली.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी जयंत येरावार व कुंटुंबीयांची सामाजिक बांधिलकी तसेच शेतकऱ्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा यावेळी सांगितला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते धर्मार्थ दवाखान्याचे व रूग्णवाहिणीचे लोकार्पण करण्यात आले. या दवाखान्याचा व रुग्णवाहिकेचा परिसरातील सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयंत येरावार यांचा सपत्नीक प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला पं. स. उपसभापती किशोर गव्हाळकर, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर व सुनीता राऊत, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, संजय गाते, हाजी अब्दुल हमीद, नगरसेवक नंदू वैद्य, आबाजी महाराज देवस्थानचे अरूण दाणी, सतीश दाणी, सरपंच संगीता लोखंडे, विनायक भोयर, गंगाधर राऊत, आबाराव भोयर, श्याम कावळे, गजानन डफरे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.