नाट्यगृहासाठी सरसावल्या सामाजिक संघटना
By admin | Published: July 14, 2017 01:29 AM2017-07-14T01:29:31+5:302017-07-14T01:29:31+5:30
मागील दोन दशकांपासून वर्धेकरांनी सांस्कृतिक सभागृहाची, संकुलाची सातत्याने मागणी केली आहे;
जिल्हा प्रशासनाला निवेदन : सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील दोन दशकांपासून वर्धेकरांनी सांस्कृतिक सभागृहाची, संकुलाची सातत्याने मागणी केली आहे; पण कलेचा वारसा लाभलेल्या वर्धा शहर तथा जिल्ह्याला नाट्यगृह लाभले नाही. प्रत्येकवेळी राज्य शासन व प्रशासनाने या मागणीला बगल दिली आहे. आता मात्र सामाजिक, सांस्कृतिक संघटना या मागणीसाठी पुन्हा एकदा सरसावल्या आहेत. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना गुरूवारी निवेदनही देण्यात आले.
वर्धेकरांचा हक्क असलेल्या जिल्हा सांस्कृतिक सभागृहाची दीर्घ काळापासून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य संघटनांना करावी लागत आहे. वर्धा नगरी आणि जिल्हा आकारमानाने लहान असला तरी सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आणि क्रियाशील आहे. हा जिल्हा अनेक चळवळींचे माहेरघर राहिला आहे. येथील उपक्रमांचे अनुकरण राज्यात केले जाते. वर्षभर साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, व्याख्यान, परिसंवाद, रंगचित्रे, छायाचित्रे, हस्तकला प्रदर्शन आदी अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जातात; पण आंतरराष्ट्रीय ख्याती असलेला गांधी जिल्हा सांस्कृतिक संकुलापासून अद्यापही वंचित आहे. राज्य शासनाने वर्धा जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारे नाट्यगृह, सभाकक्ष, कलादालन, उद्यान, वाहनतळ यांचा समावेश असणारे सांस्कृतिक संकुल निर्माण करावे. पूढील पिढीला आपल्या कलागुणांच्या सादरीकरणाची तथा व्यक्तिमत्व विकासाची संधी द्यावी. जागा निश्चित केली असल्यास त्या जागेवर सांस्कृतिक सभागृहासाठी आरक्षित जागा, असा फलकही त्वरित लावण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर, अध्ययन भारतीचे हरिष इथापे, वसंत जळीत, सही फिल्मस्चे प्रा. गिरीष भोवरे, नई तालीम समितीचे प्रभाकर पुसदकर, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, निवृत्त अधिकारी भारतीय स्टेट बँक शत्रूघ्न मून, विदर्भ साहित्य संघ वर्धाचे सहसचिव प्रा. पद्माकर बाविस्कर, डॉ. राजेश देशपांडे, सेवा समितीचे उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे यासह अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांना पाठविण्यात आल्या आहेत.
नाट्य तथा सिनेसृष्टीला कलावंत देणारा जिल्हाच उपेक्षित
कला, अभिनयाचा वारसा जोपासणारा जिल्हा म्हणून वर्धेची ओळख आहे. या जिल्ह्याने नाट्य तसे सिने सृष्टीला अनेक कलावंत दिले आहेत. कुणी मराठी सिनेमामध्ये नाव केले तर कुणी हास्याच्या मैफलीमध्ये वर्धेची मान उंचावली. नाट्य क्षेत्रात तर वर्धेची अनेक नाटकेही गाजलेली आहेत. असे असताना सुमारे दोन दशकांपासून वर्धेकरांना सांस्कृतिक सभागृहापासून वंचित राहावे लागत आहे, ही शोकांतिकाच म्हणावी लागते. अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक व साहित्य संघटनांनी वर्धा जिल्ह्याला सांस्कृतिक संकूल मिळावे म्हणून प्रयत्न केलेत; पण शासन, प्रशासनाने याकडे दुर्लक्षच केले. आता पुन्हा एकदा हा मुद्दा रेटण्यात आला असून शासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे.