लघुपटातून विद्यार्थ्यांनी मांडल्या सामाजिक समस्या
By Admin | Published: April 22, 2017 02:09 AM2017-04-22T02:09:56+5:302017-04-22T02:09:56+5:30
अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ स्वत:च्या उत्कर्षाकरिता न करता ज्ञानाचा वापर समाजाकरिता करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.
वर्धा : अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ स्वत:च्या उत्कर्षाकरिता न करता ज्ञानाचा वापर समाजाकरिता करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. बापुराव देशमुख अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी लघुपटांची संकल्पना पुढे आणली. यात वर्धेसह बल्लारशाह, चंद्रपूर, अमरावती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सामाजिक जाणिवेचे विषय तरलतेने लघुपटाच्या माध्यमातून साकारले.
या लघुपटातून राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छता अभियान, महिला सुरक्षितता, नोटाबंदी, महिला सक्षमीकरण या विषयांचे चित्रिकरण विद्यार्थ्यांनी कल्पकतेने केले. सामाजिक जाणिवेच्या, समस्येच्या ‘क्लिप्स’ आपण सोशल मिडीयावर पाहत असतो. बघतो. याचा अभ्यास करून सामाजिक जाणीव व समस्यांच्या जागृती लघुपटाद्वारे मांडून एक अभिनव स्पर्धा महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आली. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आॅनलाईन प्रवेश मागविले. एक दोन नव्हे तर पंधरा प्रवेश आलेत. यासोबत छायाचित्र प्रदर्शनात विविध महाविद्यालयातून २०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. लघुपटाचे परिक्षण रितेश वाडीभस्मे यांनी केले.
बक्षीस वितरण समारंभाला प्राचार्य डॉ. महेंद्र गायकवाड, इलेक्ट्रीकल विभागप्रमुख प्रा. आर.जी. श्रीवास्तव, अॅड. चेतन सयाम, प्रा.एस.डी. झिलपे, विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष रोहीत ठक्कर, कार्यक्रम संयोजक आशिष चव्हाण उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेचे कौतुक करून एक चांगला उपक्रम लघुपटाच्या माध्यमातून समोर आला असून याला पुढे व्यापक स्वरूप देण्यात येईल, असे सांगितले.
लघुपट स्पर्धेत प्रथम परितोषिक अॅन्टी पॉटीमॅन या लघुपटाने संपादन केला तर प्राऊड टु.बी. इंडियन, फिनॉले फिन्स या लघुपटाने अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळविले. छायाचित्र स्पर्धेमध्ये मनीष जैसल, द्वितीय नरेश गौतम व तृतीय पारितोषिक शुभम पाठक यांनी प्राप्त केले.
हा अभिनव उपक्रम दरवर्षी घेण्यात येणार असून लघुपटाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणे, समाजामध्ये जागृती निर्माण करणे आणि वास्तवाचं सादरीकरण करणे आदीचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.(स्थानिक प्रतिनिधी)