समाज कल्याणचा लिपीक जाळ्यात
By admin | Published: May 8, 2014 02:56 AM2014-05-08T02:56:04+5:302014-05-08T02:56:04+5:30
बलात्कार करुन आरोपीने तरुणीला जाळून ठार केले. मृत तरुणी ही अनुसूचित जमातीतील असल्यामुळे तिच्या कुटुंबाला समाज कल्याण विभागाकडून आर्थिक मदत मिळवून ..
एसीबीची कारवाई : लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविताच अटक
वर्धा : बलात्कार करुन आरोपीने तरुणीला जाळून ठार केले. मृत तरुणी ही अनुसूचित जमातीतील असल्यामुळे तिच्या कुटुंबाला समाज कल्याण विभागाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी २0 हजारांची लाच मागणार्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवारी दुपारी येथे करण्यात आली.
सुरेश डोमाजी राऊत (४५) असे आरोपीचे नाव आहे. लाचेची मागणी करुन ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्याच्याविरुद्ध शहर ठाण्यात कलम ७, १५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलीस सूत्रानुसार, समुद्रपूर तालुक्यातील गव्हा येथील नीळकंठ परसराम मेश्राम यांच्या २0 वर्षीय मुलीवर गावातीलच एका नराधमाने बलात्कार करुन तिला जाळून मारले. या प्रकरणात सचिन शेंदूरकर याला अटक करण्यात आली.
मृत तरुणी ही अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यामुळे समाज कल्याण विभागाच्यावतीने पीडित कुटुंबाला मदत देण्याची तरतूद आहे. ही बाब हेरुन घटनेच्या चार-पाच दिवसांनी वर्धा येथील सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाचा लिपीक सुरेश राऊत याने मेश्राम यांचे गव्हा येथील घर गाठून याबाबतची माहिती दिली आणि मदत मिळवून देण्याची हमी दिली.
यासाठी जात प्रमाणपत्र, मृत मुलीचे छायाचित्र आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र घेऊन कार्यालयात बोलावून घेतले. नीळकंठ मेश्राम हे गावातीलच रुपेश लोखंडेला सोबत घेऊन कार्यालयात गेले असता लिपीक राऊतने २0 हजारांची मागणी केली. यावेळी रुपेशने राऊतला अशाही गंभीर प्रकरणात लाच मागता, अशा शब्दात त्याचा खरपूस समाचार घेतला. तरीही राऊतने १0 हजार रुपयांची मागणी केली. आपली आर्थिक परिस्थिती काहीच देण्यासारखी नाही म्हणून मेश्राम यांनी लाच देण्यास थेट नकार दिला.
मात्र राऊतने त्यांना मी पहिला धनादेश काढून देतो. तो बँकेत वटला की रक्कम द्या, अशी मागणी केली. यानुसार राऊतने १ लाख ८७ हजार ५00 रुपयांचा पहिला धनादेश काढून दिला. तो वटताच त्याने लाचेची रक्कम मागितली. मात्र मेश्राम यांना लाच देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी थेट वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांनी पोलीस अधीक्षक वसंत शिरभाते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात सापळा रचला.
दरम्यान, सुरेश राऊत याने २0 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. या पुराव्याच्या आधारे त्याला अटक केली. सदर कारवाईत दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्यासह प्रदीप देशमुख, राजेंद्र बुरबुरे, गिरीश कोरडे, निषित पांडे, प्रदीप कदम, संजय डगवार, नरेंद्र पाराशर, मनीष घोडे व रागिणी हिवाळे यांनी सहकार्य केले.(जिल्हा प्रतिनिधी)