प्रत्येक तालुक्यात उभारणार माती परीक्षण प्रयोगशाळा
By admin | Published: April 2, 2015 02:02 AM2015-04-02T02:02:36+5:302015-04-02T02:02:36+5:30
शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी शेतात असलेल्या मातीचे परीक्षण करता यावे व त्यानुसार पिकांचे नियोजन करण्यास मदत मिळावी, ...
वर्धा : शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी शेतात असलेल्या मातीचे परीक्षण करता यावे व त्यानुसार पिकांचे नियोजन करण्यास मदत मिळावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
देवळी येथील नगर परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सव, शेतकरी मेळावा तसेच कृषी परिसंवादाचे उद्घाटन राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार व शेतकरी नेते पाशा पटेल होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रा रणनवरे, जि़प़ उपाध्यक्ष विलास कांबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरिष गोडे, माजी खासदार विजय मुडे, सुरेश वाघमारे, शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर, नगराध्यक्ष शोभा तडस, सभापती मिलिंद भेंडे, माजी उपाध्यक्ष राजेश बकाने, गटनेता विलास जोशी आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांवर अवेळी पाऊस व गारपीटीचे संकट आले असताना शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देताना ना. अहिर म्हणाले की, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा केली आहे़ राज्य सरकारद्वारे झालेल्या नुकसानीबाबत सर्वेक्षण सुरू आहे. शेतकऱ्यांना यापुढेही मदत देण्यासाठी केंद्र सरकार निश्चित भूमिका घेईल, असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मार्गदर्शन होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले़ पाशा पटेल यांनी जलसंधारण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजाणी करण्याची आवश्यकता असून प्रत्येक शेतात जलसंधारणाचा कार्यक्रम राबवावा, असे सांगितले़ खासदार रामदास तडस यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. प्रकल्पाला गती देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करता यावे म्हणून कृषी मेळावा आयोजित केल्याचे खा. तडस म्हणाले.(प्रतिनिधी)