वर्ष लोटूनही मिळेना सौर कृषिपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 06:00 AM2020-01-05T06:00:00+5:302020-01-05T06:00:08+5:30

गांगापूर (देवळी) येथील युवा शेतकरी प्रणय आईच्या नावे असलेल्या शेतीत वीजपुरवठा मिळावा याकरिता वीज महावितरण कंपनीकडे अर्ज केला. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा देता येणार नाही, १० ते ११ वीजखांब उभारावे लागतील, असे सांगून नकार देत सौर कृषिपंपाची जोडणी घेण्यास बाध्य केले. शेतकऱ्याने आई सुनंदा पद्माकर जयपूरकर यांच्या नावे २ फेब्रुवारी २०१९ ला ऑनलाईन प्रक्रिया केली. शिवाय, २४ हजार ७१० रुपयांचे डिमांडही भरले.

Solar agri-pumps do not meet even after a year | वर्ष लोटूनही मिळेना सौर कृषिपंप

वर्ष लोटूनही मिळेना सौर कृषिपंप

Next
ठळक मुद्देयुवा शेतकरी हतबल। वीज महावितरण, सीआरआय एजन्सीची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेकरिता संपूर्ण प्रक्रिया करूनही वर्षभरापासून शेतात कृषिपंप लागला नाही. शेतकरी संबंधित कार्यालयात येरझारा करून आणि विचारपूस करून अक्षरश: थकून गेला. मात्र, यंत्रणेची अनास्था कायम आहे. त्यामुळे दाद मागायची तरी कुणाकडे? असा प्रश्न शेतकऱ्याने केला आहे.
गांगापूर (देवळी) येथील युवा शेतकरी प्रणय आईच्या नावे असलेल्या शेतीत वीजपुरवठा मिळावा याकरिता वीज महावितरण कंपनीकडे अर्ज केला. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा देता येणार नाही, १० ते ११ वीजखांब उभारावे लागतील, असे सांगून नकार देत सौर कृषिपंपाची जोडणी घेण्यास बाध्य केले. शेतकऱ्याने आई सुनंदा पद्माकर जयपूरकर यांच्या नावे २ फेब्रुवारी २०१९ ला ऑनलाईन प्रक्रिया केली. शिवाय, २४ हजार ७१० रुपयांचे डिमांडही भरले. यानंतर जयपूरकर यांना भ्रमणध्वनीवर सौरपंप बसविण्याबाबतचा संदेशही प्राप्त झाला. सौर कृषिपंप बसविण्याकरिता शेतकऱ्याने सीआरआय एजन्सीची निवड केली. यावेळी एजन्सीचालक आणि वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडून जूनमध्ये सौर कृषिपंप बसवून देण्यात येईल, असे सांगण्यात आले. सिंचनाची व्यवस्था होणार असल्याने जयपूरकर यांनी शेतात कर्ज काढून अद्रक पिकाची लागवड केली. चार ते पाच लाखांचे उत्पन्न होईल, अशी आशा जयपूरकर यांनी बाळगली. मात्र, सौर कृषिपंप मिळाला नाही. सिंचनाअभावी अद्रकाचे पीक जमिनीतच सडल्याने लागवडीचा खर्च पाण्यात गेला आणि आर्थिक संकट ओढवले. यानंतर जयपूरकर यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, सीआरआय कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सौर कृषिपंप लावत असेल तर लावा, असे उद्धट उत्तर दिले; मात्र वर्ष लोटूनही शेतात सौर कृषिपंप लागला नाही. आठ दिवसांत कृषिपंप न लागल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा जयपूरकर यांनी दिला आहे.

वीज वितरणचा अनागोंदी कारभार
वीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांसह इतर अधिकाऱ्यांकडे याविषयी विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. या संपूर्ण व्यवहाराविषयी हा विभाग अनभिज्ञ आहे. केवळ अपडेट घेत आहोत, असे म्हणून अधिकारी वेळ मारून नेत आहेत. जिल्हाधिकाºयांनी या प्रश्नात लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी प्रणय जयपूरकर यांनी केली आहे.

योजना फसवी असल्याची ओरड
सौर कृषिपंपाकरिता जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्रक्रिया करीत एजन्सीची निवड केली. मात्र, अद्याप कित्येक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. नेमलेल्या एजन्सीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

बळजबरीने लादली जातेय योजना
शेतकरी वीज वितरणकडे वीजपुरवठ्याची मागणी करीत असताना वीज वितरणचा देण्यास नकार असून सौर कृषिपंप घेण्यास बाध्य केले जात असून बळजबरीने ही योजना शेतकऱ्यांवर थोपविली जात आहे. जिल्हा प्रशासनाचे यावर मात्र, नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक संबंधित यंत्रणांकडून सुरूच आहे.

Web Title: Solar agri-pumps do not meet even after a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती