गठाण पडून कामगाराचा मृत्यू
By admin | Published: April 7, 2016 02:08 AM2016-04-07T02:08:42+5:302016-04-07T02:08:42+5:30
जामच्या पी.व्ही. टेक्सटाईल्स येथे अंगावर भेल (गठाण) पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजता घडली.
समुद्रपूर : जामच्या पी.व्ही. टेक्सटाईल्स येथे अंगावर भेल (गठाण) पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजता घडली. मृतकाच्या मुलांना नौकरी व नुकसान भरपाईपोटी २५ लाख रूपयांची मागणी कामगार संघटनेने केली आहे.
दिवाकर दत्तोबा चौधरी (४५) असे मृत कामगाराचे नाव आहे. तो २० वर्षापासून कार्यरत होता. कच्चा माल गठाण (भेल) मिक्सींग विभागाला पोहचविण्याचे काम सुरू होते. ठाकरे, खेरकर, चाफले हे तीन कामगार सोबत काम करीत होते. एका गठानाची वजन ३० किलोपर्यंत असते व याची मोठी थप्पी त्या ठिकाणी रचली होती. थप्पी वरून या गठाणी (भेल) मिक्सिंग विभागाला पोहोचविल्या जात होत्या. परंतु अचानक एक दिवाकर दत्तोबाच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये पी.व्ही. टेक्सटाईल्सचे व्यवस्थापन जयंत धोटे व कर्मचारी माधव देशपांडे यांनी दाखल केले. घटनास्थळी कामगार नेते तथा माजी आमदार राजू तिमांडे, प्रहारचे गजू कुबडे, कामगार युनियन अध्यक्ष नरेंद्र रघाटाटे, सुनील कनकुरीया, कामगार प्रतिनिधी प्रमोद शेंडे, अरविंद दूरबडे, मनीष सुटे, जामचे उपसरपंच सचिन गावंडे, कामगार उमेश महल्ले, गावातील ऋृषी धोंगडे, लक्ष्मण डंभारे, प्रमोद चौकेसह कामगार व गावकऱ्यांनी मदतीची मागणी व्यवस्थापकाकडे केली. वृत्तलिहेपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नव्हता.(तालुका प्रतिनिधी)