महाराजस्व अभियांनांतर्गत समाधान शिबिर
By admin | Published: September 20, 2015 02:40 AM2015-09-20T02:40:26+5:302015-09-20T02:40:26+5:30
महाराजस्व अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांची माहिती व त्वरित अंमलबजावणीसाठी पाच टप्प्यात शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
पंकज भोयर यांची माहिती : तालुक्यात पाच टप्पे होणार
सेलू : महाराजस्व अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांची माहिती व त्वरित अंमलबजावणीसाठी पाच टप्प्यात शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. २ आॅक्टोबर रोजी घोराड येथे शिबिर घेण्यात येणार असल्याचे आ.डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. विश्राम गृहात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
शेतकरी शेतमजुरांच्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी क्रांतिकारी निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानात नागरिकांचे समाधान होणार आहे. नवीन शिधापत्रिका, नावे कमी-चढविणे, दुय्यम शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आपसी वाटणीपत्र, विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप आदी योजनांच्या लाभासाठी २५ सप्टेंबरपर्यंत तलाठी व तहसील कार्यालयात अर्ज करावयाचे आहे. ज्यांनी अर्ज केले, त्यांना २ आॅक्टोबरला घोराड येथे होणाऱ्या समाधान शिबिरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.
शिबिरांसाठी घोराड, सुरगाव, सेलू, बेलगाव, सुकळी स्टे., जयपूर, महाबळा या महसूल सांझाची निवड करण्यात आली आहे. घोराडनंतर केळझर, हिंगणी, येळाकेळी व झडशी येथे शिबिर घेण्यात येणार आहे. २३ रोजी अपंगांना शासकीय अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी वीर भगतसिंह ग्रामीण विकास बहु. संस्थेद्वारे ग्रामीण रुग्णालयात शिबिर घेण्यात येत आहे. जिल्ह्यात २९ हजार ५८६ अपंग व्यक्ती असून ४ हजार ५०० व्यक्तींनाच प्रमाणपत्र मिळाले. उर्वरित २५ हजार अपंग प्रमाणपत्रविना असून त्यांना न्याय मिळेल.(शहर प्रतिनिधी)