भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; मुलगा जागीच गतप्राण, आई गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 05:15 PM2021-12-24T17:15:50+5:302021-12-24T17:23:20+5:30
नागपूर-हैदराबाद महामार्गावर महाकाली नगरीसमोर आज दुपारच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मुलाचा जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली.
वर्धा : हिंगणघाट शहरातील नागपूर-हैदराबाद महामार्गावर महाकाली नगरीसमोर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार मुलगा जागीच गतप्राण झाला तर त्याची आई गंभीररित्या जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी दुपारच्या सुमारास झाला.
गजानन पुसदेकर (४०) असे मृतकाचे तर गंगा पुसदेकर (६०) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याच्या उकरडा येथील रहिवासी आहेत.
दुचाकीवरील माय-लेक चंद्रपूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, चंद्रपूर येथील चड्डा ट्रान्स्फर कंपनीच्या (एम. एच. ३४ बी. झेड. ०१९३) ट्रकने महाकाली नगरी समोर दुचाकीला (एम. एच. ३४ बी. इ. १०३८) जबर धडक दिली. यात गजानन याला ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर गंगा या गंभीर जखमी झाल्या.
अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत गंभीर जखमी गंगा यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाटचे ठाणेदार संपत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दीपेश ठाकरे, चांगदेव भुरंगे, प्रवीण चौधरी, संपत वलतकर, नितीन राजपूत, अझहर खान, प्रदीप राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली आहे.