पित्याचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवून जमीन लाटली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 09:38 PM2024-05-16T21:38:03+5:302024-05-16T21:38:18+5:30
पोलिस अधीक्षकांना अहवाल सादर : कारवाईला मात्र अद्याप मुहूर्त मिळेना
वर्धा: एका मुलाने पित्याच्या मृत्यूचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्यांच्या नावे असलेली जमीन लाटली. ही बाब उघडकीस आल्यानंतर देवळी पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत ही बाब सिद्धही झाली. मात्र, तीन महिने लोटूनही संबंधित मुलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.
याप्रकरणी आपले सरकार पोर्टलवर ४ जानेवारी रोजी तक्रार करण्यात आली होती. शिरसगाव धनाढे येथील काही वर्षांपूर्वीचे रहिवासी माणिक बळवंत निस्ताने हे १९९५ मध्ये घर सोडून निघून गेले. ते घरी परतले नाही. ते जीवित आहे किंवा मृत्यू झाल्याबाबत माहिती नाही. मात्र, त्यांचा मुलगा अशोक माणिक निस्ताने याच्याकडे वरूड ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे माणिक निस्ताने हे सेवाग्राम रुग्णालयात मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र आहे.
अशोक निस्ताने बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून शासकीय कामात वापर करतो, त्याची चौकशी करून फसवणुकीची कार्यवाही करावी, अशी मागणी सचिन ओली यांनी केली होती. या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी संबंधितांचे बयाण नोंदविले. पोलिसांनी सत्यता पडताळणी केली असता वरुड ग्रामपंचायत व सेवाग्राम रुग्णालयात माणिक बळवंत निस्ताने, रा. शिरसगाव धनाढे यांचा मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी क्रमांक ५०२ व दाखल क्रमांक ४८८ वर सेवाग्राम रुग्णालयाच्या अहवालानुसार हिंगणघाट येथील आठ दिवसांच्या बाळाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दस्तावेजात छेडछाड करून माणिक निस्ताने यांच्या नावाचे बनावट मृत्युपत्र तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
शेती केली नावावर, फेरफारही झाला
अशोक निस्ताने यांनी शिरसगाव तलाठी कार्यालयात बनावट प्रमाणपत्राचा वापर शेतीच्या फेरफारकरिता केला. तलाठ्याने लेखी फेरफाराची नोंद वहीची साक्षांकित प्रत तसेच दाखलाद्वारे शेतीचा फेरफार घेण्यात आल्याचे कळविले. अशोकने बनावट प्रमाणपत्राच्या आधारे शिरसगाव धनाढे येथील माणिक निस्ताने यांच्या नावावरील स. नं २४७ व आराजी १.३८ हे. आर वर्ग १ ची शेती संकेत अशोक निस्ताने याचे नावे फेरफार केली. अशोकने बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून शासकीय कामात वापर केल्याचा ठपका पोलिसांनी चौकशीत ठेवला आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६८, ४७२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची परवानगी मिळण्यासाठी देवळीचे पोलिस उपनिरीक्षक जगदीश हटवार यांनी पोलिस अधीक्षकांना अहवाल सादर केला हाेता. त्यावर कोणती कारवाई झाली, ही बाब अद्याप गुलदस्त्यातच आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालयाला आम्ही अहवाल पाठवला आहे. वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. यात निश्चितच गुन्हा दाखल केला जाईल. - राहुल चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी, पुलगाव.