यात्रेतून जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 10:59 PM2017-12-04T22:59:21+5:302017-12-04T22:59:58+5:30
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत सहभागी नेत्यांनी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील अंदोरी येथे शेतकऱ्यांची संवाद साधला.
आॅनलाईन लोकमत
देवळी : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत सहभागी नेत्यांनी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील अंदोरी येथे शेतकऱ्यांची संवाद साधला. शिवाय बोंडअळीची समस्या जाणून घेण्याकरिता शेतात जावून कपाशीची पाहणी केली. एवढी बिकट समस्या असतानाही शासनाकडून दखल घेण्यात येत नसल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.
यवतमाळ जिल्ह्यातून रविवारी वर्धा जिल्ह्यात दाखल झालेल्या यात्रेचा सोमवारी दिवसभर १३.५ कि.मी चा प्रवास झाला. शिरपूरवरून भिडी मार्गे ही यात्रा रत्नापूर, दापोरी, एकपाळा मार्गे देवळी येथे पोहचली. या यात्रेदरम्यान महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील, आ. राजेश टोपे, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रकाश गजबे, आ. विद्या चव्हाण, आ. गुलाबराव देवकर, चित्रा वाघ, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, सुरेश देशमुख, राजु तिमांडे, सुधीर कोठारी, सुरेखा ठाकरे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नवरदेवाचा अजितदादांसोबत सेल्फी
भिडी ते देवळी मार्गावर एक लग्नाची वरात या पदयात्रेच्या जवळ थांबली. या वरातीतील एका गाडीतून नवरदेव उतरला. दरम्यान नवरदेवाला अजीत पवार यांच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा झाली. यावेळी अजीत पवारांसह इतर नेत्यांसोबत नवरदेवाने सेल्फी घेतली. यावेळी अजितदादांनीही नवरदेवाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच आहेर देऊन लग्नासाठी रवाना केले.
भाजपाने शेतकऱ्यांचा घात केला - जयंत पाटील
कापसाला ७ हजार व सोयाबीनला ६ हजाराचा भाव देण्याची हमी घेणारे हे सरकार केवळ थापा मारून सत्तेवर आले आहे. कापसाला चार ते साडेचार हजार व सोयाबीनला २ हजार २०० पर्यंतचा भाव देवून शेतकºयांचा गळा घोटला जात आहे. भाजपा सरकारने आमचा विश्वासघात केल्याची भावना जनसामान्यांची झाली आहे, अशी टीका राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली. देवळी येथे हल्लाबोल रॅलीच्या सभेत ते बोलत होते.
सुप्रिया सुळेंचे कोरकू आदिवासींसोबत नृत्य
हल्लाबोल यात्रेदरम्यान खा. सुप्रिया सुळे यांनी यात्रेत सहभागी कोरकु आदिवासी बांधवांसह नृत्य केले. त्यांचे नृत्य पाहून परिसरातील नागरिकांनीही फेर धरला. यात्रेदरम्यान सहभागी नेते सर्वसामान्यांशी जुळवून घेत असल्याचे दिसून आले.
वर्धा शहरात मंगळवारी जाहीर सभा
हल्लाबोल पदयात्रा सोमवारी रात्री देवळी गावात मुक्कामी आहे. तेथून ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता वर्धा शहरात पदयात्रा पोहचणार आहे. त्यानंतर सर्कस ग्राऊंड मैदानावर जाहीर सभा होणार आहे.