तालुक्यात वाढणार कपाशीचा पेरा
By admin | Published: May 30, 2014 12:18 AM2014-05-30T00:18:30+5:302014-05-30T00:18:30+5:30
गत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात नैसर्गिक संकटाने थैमान घातले आहे. घाम गाळून हाताशी आलेले नगदी पीक नैसर्गिक संकटाने पूर्णत: उद्ध्वस्त केले. यामुळे तालुक्यातील २२२ गावांत २७ हजार ५६४ शेतकर्यांना
आर्वी : गत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात नैसर्गिक संकटाने थैमान घातले आहे. घाम गाळून हाताशी आलेले नगदी पीक नैसर्गिक संकटाने पूर्णत: उद्ध्वस्त केले. यामुळे तालुक्यातील २२२ गावांत २७ हजार ५६४ शेतकर्यांना आर्थिक फटका बसला. अतवृष्टी व गारपिटीमुळे दोन्ही हंगाम नैसर्गिक संकटात सापडले. अतिपावसात सोयाबीन टिकाव धरत नाही. यामुळे मागील वर्षी सोयाबीनचा पेरा वाढविणार्या शेतकर्यांनी यंदा कपाशीच्या लागवडीला प्राधान्य दिल्याचे दिसते. यामुळे यंदा तालुक्यात कपाशीचा पेरा वाढण्याचे संकेत आहेत.
मागील वर्षी तालुक्यातील शेतकर्यांनी सोयाबीन पेरणीला प्रथम प्राधान्य दिले होते; पण अतवृष्टीने सोयाबिन पीक वाहून गेले. अनेक शेतकर्यांच्या सोयाबीनला कवडीमोल भाव मिळाला. यामुळे यावर्षी २0१४ च्या खरीप हंगामात तालुका कृषी विभागाच्या पीक नियोजनात शेतकर्यांनी कपाशी पेरणीला प्राधान्य दिल्याचे दिसते. आर्वी तालुका कृषी विभागाच्यावतीने दरवर्षी खरीप पीक नियोजन अंदाज तयार केला जातो. त्यानुसार शेतकरी आपल्या शेतात कोणते पीक लावणार, याचे नियोजन केले जाते. यावर्षीच्या खरीप नियोजनामध्ये सोयाबीनचा पेरा आर्वी तालुक्यात २३ हजार हेक्टर दाखविण्यात आला आहे. मागील वर्षी हा पेरा २५ हजार २0 हेक्टर होता. कपाशीची लागवड १७ हजार ५00 हेक्टरवर होणार आहे. मागील वर्षी १६ हजार १२0 हेक्टरमध्ये कपाशी लावण्यात आली होती. तूर यावर्षी ७ हजार क्षेत्रावर राहणार असून मागील वर्षी ती ६ हजार ५८0 हेक्टरवर होती तर ज्वारी ४५0 हेक्टर, मुंग १५0 हेक्टर, उडीद १५0 हेक्टरवर पीक नियोजन करण्यात आले आहे.
मागील वर्षी झालेल्या अतवृष्टी व गारपिटीने सोयाबीन, कपाशी, तूर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामुळे दोन्ही हंगाम शेतकरी आर्थिक संकटात सापडले. यावर्षी कपाशी पेराचा कमी होता तर भाव मात्र पाच हजारांच्या वर आहे. त्या तुलनेत सोयाबीनचे भाव अखेरपर्यंत वाढले नाहीत. चना आणि गव्हाची आराजी व भावातही यावर्षी शेतकर्यांना अपेक्षित भाव मिळाला नसल्याने आर्थिक संकट कायम असल्याचे दिसते.(तालुका प्रतिनिधी)