१७ टक्के क्षेत्रात दुबार पेरणी
By admin | Published: June 25, 2017 12:34 AM2017-06-25T00:34:21+5:302017-06-25T00:34:21+5:30
यावर्षी मान्सून अगदी वेळेवर येणार म्हणून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी कोलमडला आहे.
पावसाची दडी : पुन्हा सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : यावर्षी मान्सून अगदी वेळेवर येणार म्हणून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी कोलमडला आहे. आष्टीसह तालुक्यात १७ टक्के पेरण्या फसल्या आहेत. यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. बियाणे व पेरणी खर्चाकरिता बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराची पायरी गाठून जुगाड करावे लागणार असल्याचे दिसते.
मागील वर्षी कापूस व तुरीला योग्य भाव मिळाला नाही. शासनाच्या लेटलतिफ धोरणाचा फटका उत्पन्नाला बसला आहे. यामुळे शेतकरी धायकुतीस आले आहेत. मोठ्या कालावधीनंतर कर्जमाफीची घोषणा झाली; पण बँकांना अद्याप आदेश आले नाहीत. त्याचा फटका कर्ज वाटपालाही बसला आहे. १० हजार रुपये नगदी देण्याचा निर्णयही अद्याप कागदावरच आहे. यामुळे पेरणीसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जून महिना जवळपास संपत आला आहे. जुलै महिन्यात पाऊस काय करतो, यावर शेतकऱ्यांचे गणित अवलंबून आहे. तालुका कृषी अधिकारी प्रमोद पेटकर यांना पेरणीबाबत विचारणा केली असता तीन दिवस झालेला पावसाळा गृहित धरून १७ टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली; पण त्यानंतर पावसाने दडी मारल्याने स्थिती गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांनी चांगला, समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन पेटकर यांनी केले आहे. सध्या ढगाळ वातावरण आहे. शेतीची पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाली आहे. यामुळे पावसावर सर्वकाही अवलंबून आहे.
अल्पभूधारक व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची संख्या ७० टक्के आहे. या गटातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीकरिता प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येते. शासनाने आदेश बँकांपर्यंत पोहोचविले नाहीत. यामुळे मोठी तारांबळ उडत आहे. शेतकरी बँकामध्ये गेल्यानंतर कर्जमाफी आदेश आल्यानंतरच नवीन कर्ज देणार असल्याचे बँक आॅफ इंडिया व भारतीय स्टेट बँकेकडून सांगण्यात आले आहे. पाच एकरावरील शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरल्याने तत्सम शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येणार आहे. खरीप हंगामातील लगबग सुरू झाली तरी सर्व काही पावसावर अवलंबून आहे. आष्टी तालुक्यात पाऊस यावा म्हणून शेतकरी धोंडी काढत आहे. ग्रामीण भागात विविध नवस पूर्ण केले जात आहे.
कर्जातील विलंबाचाही पेरणीवर परिणाम
आष्टी तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व को-आॅपरेटीव्ह बँक बंद झाल्याने कर्जाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने कर्जमाफी दिल्यावर या बँकेला फायदा होईल; पण राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यास विलंब लावू शकते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभविण्याची मागणी शेतकरी करीत आहे. नोड्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच कर्जाची प्रकरणे मंजूर होऊ शकतात. त्याचाही परिणाम पेरणीवर होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.
उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता
यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती; पण प्रारंभीच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. काही शेतकऱ्यांनी पेरण्याच केल्या नाहीत. त्यांना विलंब झाल्यास उत्पादनावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.