सोयाबीन @ 4925 शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने : वाढलेले भाव व्यापाऱ्यांच्या पथ्यावर
By admin | Published: May 10, 2014 12:23 AM2014-05-10T00:23:42+5:302014-05-10T02:36:37+5:30
सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी त्यांचे सोयाबीन घरी ठेवले होते; मात्र दरवाढ होत नव्हती, अशात नव्या हंगामात पैशाची भासणारी चणचण अडचणीत आणत होती.
वर्धा : सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकर्यांनी त्यांचे सोयाबीन घरी ठेवले होते; मात्र दरवाढ होत नव्हती, अशात नव्या हंगामात पैशाची भासणारी चणचण अडचणीत आणत होती. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजने त्याचे सोयाबीन विकताच बाजारात सोयाबीनचे दर वाढले. जिल्ह्यात व आसपासच्या परिसरात मोठी बाजारपेठ असलेल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सोयाबीन ४ हजार ९२५ रुपयात गेले. सोयाबीनच्या दराच्या आशेत असलेल्या शेतकर्यांच्या पदरात मात्र निराशाच आली. कापसाचे दर वाढत नाही शिवाय कापसाबद्दल शासनाचे धोरणही स्पष्ट नसल्याने शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहू लागले. पाहाता पाहता कापसापाठोपाठ सोयाबीन मुख्य पीक म्हणून समोर येवू लागले. जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन गेले. जेवढे हाती राहिले तेवढ्याला उत्तम दर मिळेल अशी आशा त्यांना होती; मात्र जोपर्यंत शेतकर्यांच्या घरी सोयाबीन होते त्या काळापर्यंत सोयाबीचे दर ३ हजार ५०० रुपयांच्यी आसपास होते. यात अनेक शेतकर्यांनी आर्थिक कळ सोसत सोयाबीनचे दर वाढेल या आशेत सोयाबीन घरी ठेवले होते. मात्र दर वाढत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिवाय खरीप हंगाम तोंडावर आला. या नव्या हंगामाची तयारी करण्याकरिता पैशाची चणचण असल्याने शेतकर्यांनी त्यांचे सोयाबीन विकणे सुरू केले. आज शेतकर्यांच्या घरी सोयाबीनचा एक दाना नसताना बाजारात सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांवर पोहोचले आहे. बाजारात आजच्या घडीला असलेले सोयाबीन हे व्यापार्यांचे आहे. त्यांचे सोयाबीन पाच हजार रुपयात जात आहे. शेतकर्यांची पडती पाहून व्यापार्यांनी घेतलेले हे सोयाबीन आहे यात दुमत नाही. मात्र शेतकर्यांचे सोयाबीन संपल्यावर बाजारात सोयाबीनचे दर वाढल्याने नेहमीच शेतकर्यांची पिळवणूक होते ती प्रथा अशीच कायम राहणार असल्याचे पुन्हा समोर आले आहे. (प्रतिनिधी) बाजार समितीत एकाएकी सोयाबीनची अशी आवक वाढली.