पावसाअभावी सोयाबीन पीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 09:45 PM2018-08-06T21:45:16+5:302018-08-06T21:45:39+5:30
१५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पावसाअभावी सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्यांची दाट शक्यता असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पावसाअभावी सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्यांची दाट शक्यता असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
कापसाचे जुनेच बियाणे असल्याने मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी कापसावर बोंडअळी येणार या भितीने परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढविला. यावर्षी पेरणी साधली. सोयाबीनची वाढ चांगली झाली. सुरुवातीपासून खंडीत स्वरूपाचा पाऊस येत गेल्याने आंतर मशागतीला वेळ मिळाला. परिणामी यावर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले होणार अशी आशा शेतकºयाना होती. त्यामुळे हे वर्ष सोयाबीनचे वर्ष आहे, अशी चर्चा शेतकºयांमधून ऐकायला मिळत असतानाच ऐन फुलोर येण्याच्या अवस्थेत हे पीक मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अडचणीत आले आहे. नक्षत्र बदलल्यावर पाऊस येईल, अशी शेतकºयांना आशा होती. पण ३-४ आॅगस्ट उलटून गेला, तरी पावसाचे चिन्ह नाही. हवामानाचा अंदाज संपूर्ण आॅगस्ट महिना कोरडा जाणार असे सांगत आहे. हा अंदाज खरा ठरला तर कोरडवाहू सोयाबीन हे पीक पुर्णत: नष्ट होण्याच्या स्थितीत राहिल. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सोयाबीन हे पीक अल्पावधीचे पीक असून ४५ दिवसात ते फुलावर येते व ९० ते ९५ दिवसात कापणीला येते. या पीकाला शेवटपर्यंत सातत्यपूर्ण पावसाची गरज असते. पण यंदा पावसाचे अत्यल्प व त्यातही मोठा खंड यामुळे हे वर्ष अवर्षणाचे जाणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत कापूस बोंडअळीने व सोयाबीन पावसाअभावी धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची झोप मात्र उडविली आहे. पाऊस न आल्यास सोयाबीनला सर्वाधिक धोका आहे.
पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
चिकणी (जा.) शिवारात भर पावसाळ्याच्या दिवसात सोयाबीन पिकाला सिंचन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हल्ली सोयाबीन पीक फुलांवर आली असून १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे फुलावर आलेले सोयाबीन पीक वाचविण्याकरिता शेतकरी धडपड करीत आहे. हीच परिस्थिती कोरडवाहू भागातील शेतकºयांची आहे. त्यांच्याकडे सिंचनाच्या सुविधा नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्याच्या काही भागात भारनियमनाच्या वेळा वेगवेगळ्या आहे. त्यामुळे शेतकºयांना कधीकधी रात्रीच्या वेळीही सोयाबीन पीकाला ओलीत करावे लागत आहे. यासाठी रात्रपाळीचा मजूरही कामावर ठेवावा लागत आहे.