सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची २६.६९ लाखांनी केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 04:40 PM2024-10-16T16:40:30+5:302024-10-16T16:42:29+5:30
शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : काकडे पुन्हा अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : परवानाधारक दलालाने शेतकऱ्यांकडून सोयाबीन पीक खरेदी करून त्याचा मोबदला न देता तब्बल २६ लाख ६९ हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात १४ रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मोहन ज्ञानेश्वर अवचट (रा. पवनार) याच्या घरी वर्धा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील परवानाधारक दलाल असलेला कैलास अजाब काकडे (रा. यशवंत कॉलनी) वर्धा हा गेला त्याने मोहनकडे असलेला सोयाबीन माल पाहून हा माल मलाच विका मी तुमच्या मालाचा चांगला भाव देईल व शेतमालाची रक्कम देखील तुम्हाला लवकर देईल, असे सांगून मोहनला विश्वासात घेऊन मोहन याने २०१७,२०१८ आणि २०१९ मध्ये शेतात पिकवलेला ५८२ क्विंटल व १८३ क्विंटल सोयाबीन आरोपी कैलास काकडे याने २९ लाख ६९ हजार ९२० रुपयांचा विकत घेतला. त्यापैकी आरोपीने मोहनला २ लाख ९० हजार रुपये रोखीने दिले. उर्वरित २६ लाख ६९ हजार ९२० रुपयांची रकमेचे इंडियन बँकेचे धनादेश २०२४ मध्ये दिले. मोहन हा धनादेश वटविण्यासाठी बँकेत गेला असता आरोपी कैलासच्या खात्यावर २०२२ पासून एकही रुपया नसल्याची माहिती मिळाली.
यावरून आरोपी कैलास काकडे याने खात्यात पुरेशी रक्कम नसतानाही धनादेश दिल्याने मोहन यांची २६ लाख ६९ हजार ९२० रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.