रस्त्याअभावी सोयाबीन शेतातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 11:23 PM2017-12-03T23:23:10+5:302017-12-03T23:23:32+5:30
शेतकऱ्यांना शेताची वहिवाट करता यावी म्हणून पांदण रस्त्यांची निर्मिती केली गेली. पण कालांतराने पांदण रस्त्यांवर अतिक्रमण झाले. काही रस्ते नष्ट झाले तर काहींची आता दुरूस्ती होत आहे. असे असले तरी अनेक शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग नसल्याने शेतकºयांची अडचण होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांना शेताची वहिवाट करता यावी म्हणून पांदण रस्त्यांची निर्मिती केली गेली. पण कालांतराने पांदण रस्त्यांवर अतिक्रमण झाले. काही रस्ते नष्ट झाले तर काहींची आता दुरूस्ती होत आहे. असे असले तरी अनेक शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग नसल्याने शेतकºयांची अडचण होत आहे. देवळी तालुक्यातील मौजा मुसलाबाद येथे असाच प्रकार होत असून दोन नाल्यांनी शेताची वाट अडविली आहे. परिणामी सोयाबीन शेतातच ढिग मारून आहे. अद्याप ते काढता न आल्याने शेतकºयाचे नुकसान होत आहे.
देवळी ते अंदोरी मार्गावर रायपूर गावाजवळ मौजा मुसलाबाद येथे वर्धेतील आशिष पावडे यांची तीन एकर शेती आहे. खरीप हंगामात त्यांनी शेतात सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली होती. यातील सोयाबीनची कापणी करण्यात आली असून ते ढीग लावून शेतात ठेवण्यात आले आहे. सोयबीन काढण्याकरिता थ्रेशर, हडंबा यासारखे यंत्रसाहित्य शेतात घेऊन जाणे गरजेचे असते; पण शेतात जाण्याकरिता रस्ताच राहिला नसल्याने सोयाबीनची काढणी रखडली आहे. मुसलाबाद येथील पावडे यांच्या शेतालगत दोन नाल्या होत्या. त्या नाल्यांचे रूपांतर मोठ्या नाल्यामध्ये झाले आहे. सध्या रबी हंगामाकरिता कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे शेतालगतचे दोन्ही नाले तुडूंब भरले आहेत. परिणामी, शेतात जाण्याकरिता रस्ताच राहिला नसल्याचे शेतकºयाकडून सांगितले जात आहे.
याबाबत संबंधित शेतकºयाने पाटबंधारे विभागाकडे विचारणा केली. सदर विभागातील अधिकाºयांनी चौकशी केली असता दोन्ही नाले अवैध आहेत. ते कुणीही खोदलेले नाहीत. पाटबंधारे विभागानेही सदर कालव्याचे काम केलेले नाही, ही बाब समोर आले. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनीही हात वर केले आहेत. परिणामी, शेतकºयाने दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोयाबीन काढणीचा हंगाम उलटला असून परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारपेठेत विकलेही गेले आहे; पण पावडे यांना शेतात जाण्याकरिता रस्ताच नसल्याने अद्याप सोयाबीनची काढणीही करता आली नाही. परिणामी, त्यांच्यावर कर्जबाजारी होऊन जगण्याची वेळ आली आहे.
पांदण रस्ता तयार करणे तथा नाले बुजविण्याची मागणी
मुसलाबाद येथील पावडे यांच्या शेतात जाण्याकरिता कुठलाही रस्ता राहिलेला नाही. पांदण रस्त्यावर सर्वत्र झुडपांचे साम्राज्य आहे तर जो रस्ता होता त्याची वाट नाल्यांनी अडविली आहे. परिणामी, शेतातील शेतमाल घरी आणणेही कठीण झाले आहे. खरीप हंगामातीलच शेतमाल घरी आणता आला नाही तर तूर पिकाचे काय होणार आणि रबी हंगामातील पेरणी कशी करावी, आदी चिंता शेतकऱ्याला त्रस्त करीत आहे. महसूल प्रशासनाने पांदण रस्ता मोकळा करून त्याची दुरूस्ती करावी तथा नाले बुजवून शेताची वहिवाट करण्याकरिता रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.