सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात १३ कोटी ७२ लाखांचा पीक विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 05:00 AM2021-06-11T05:00:00+5:302021-06-11T05:00:14+5:30
जिल्ह्यात २०२०-२०२१ च्या खरीप हंगामात १ लाख ३८ हजार २४१ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. यापैकी केवळ ७ हजार २६६ हेक्टरकरिता ८ हजार ५११ शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. मागील वर्षी सोयाबीन पिकांचे ऑगस्ट महिन्यात पडलेल्या अति पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर चक्रभुंगा आणि खोडमाशी या किडीमुळे सोयाबीनची उत्पादकता कमी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतीचा व्यवसाय हा बेभरवशाचा झाला आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ तर कधी गारपीट आणि यातूनही पीक वाचले तर किडीचा प्रादुर्भाव असतोच. त्यामुळे पीक घरी येईपर्यंत शेतकऱ्याला काहीच शाश्वती नसते. म्हणूनच शासनाने शेतकऱ्यांना संकटकाळात दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु केली. गेल्या हंगामात सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील ८ हजार १९८ सोयाबीन उत्पादकांना या पीक विम्याने तारले आहे. या शेतकऱ्यांना १३ कोटी ७२ लाख १४ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.
जिल्ह्यात २०२०-२०२१ च्या खरीप हंगामात १ लाख ३८ हजार २४१ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. यापैकी केवळ ७ हजार २६६ हेक्टरकरिता ८ हजार ५११ शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. मागील वर्षी सोयाबीन पिकांचे ऑगस्ट महिन्यात पडलेल्या अति पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर चक्रभुंगा आणि खोडमाशी या किडीमुळे सोयाबीनची उत्पादकता कमी झाली.
अशा परिस्थितीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळाली आहे. मागील वर्षी कर्ज घेतलेल्या ८ हजार १०६ तर कर्ज न घेतलेल्या ४०५ शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला होता. यामध्ये ७ हजार २६६ हेक्टर क्षेत्र अंतर्भूत झाले होते. तर १ लक्ष ३० हजार ९७५ हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला नव्हता. विमा काढलेल्या ८ हजार ५११ शेतकऱ्यांनी ६५ लक्ष ४० हजार रुपये पीक विम्यापोटी भरले होते.
सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने १२ मंडळामध्ये झालेल्या पीक कापणी प्रयोगात सोयाबीनचे उंबरठा उत्पादन कमी आले. त्यामुळे ८ हजार १९८ शेतकऱ्यांना १३ कोटी ७२ लाख १४ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यामुळे पाऊस आणि किडीमुळे पीक घरात न आलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्यामुळे थोडा तरी दिलासा मिळाला. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला नाही त्यांना मात्र नुकसानीचा सामना करावा लागला.
पूर्वी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीकविमा योजना बंधनकारक करण्यात आली होती. मात्र मागील वर्षीपासून ऐच्छिक केली आहे. त्यामुळे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी यावर्षी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा.
- अनिल इंगळे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी