४६ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात
By admin | Published: July 10, 2017 12:48 AM2017-07-10T00:48:25+5:302017-07-10T00:48:25+5:30
जिल्ह्यात गत आठ दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे पेरणीच्या कामांना जोर आला होता. पाऊस येताच शेतकऱ्यांनी रखडलेली सोयाबीनची पेरणी केली.
पावसाची दडी : २.३७ लाख हेक्टरवर पेरण्या आटोपल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात गत आठ दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे पेरणीच्या कामांना जोर आला होता. पाऊस येताच शेतकऱ्यांनी रखडलेली सोयाबीनची पेरणी केली. पेरलेले सोयाबीन अंकुरले; मात्र गत चार दिवसांपासून पावसाने मारलेल्या दडीने व रोजच तापत असलेल्या उन्हामुळे सोयाबीनचे उगविलेले अंकूर करपण्याच्या मार्गावर आहेत. पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांचाही धीर खचत आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २ लाख ३७ हजार २५४ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. यात १ लाख ६० हजार १२८ हेक्टरवर कपाशी लागवड झाली आहे. तर पावसाच्या अनियमिततेमुळे आतापर्यंत केवळ ४५ हजार ९९० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. तर ३० हजार ६९६ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला आहे. जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून पावसाने मारलेल्या दडीमुळे झालेल्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत. शेतात अंकुरलेली कपाशी आणि सोयाबीनची झाडे पावसाअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. यामुळे बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे.
जुलै महिना मध्यात पोहोचला. या काळापर्यत खरीपाच्या पेरण्या पूर्ण होत असल्याच्या नोंदी कृषी विभागात यापूर्वीच्या काळात झाल्या आहेत. यंदा मात्र चित्र उलटल्याचे दिसत आहे. आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी यंदा पावसाच्या लहरीपणावर विश्वास ठेवत नसल्याचे दिसून आले. वेळोवळी पावसाने दिलेल्या दडीमुळे यंदा शेतकऱ्यांनी पेरणीकडे पाठच केल्याचे दिसून आले आहे. प्रारंभीपासूनच जिल्ह्यातील शेतकरी पावसानंतरच पेरणी म्हणत आहे. यंदा पाऊस आल्यानंतर पेरणीला प्रारंभ झाला; मात्र गत चार पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पुन्हा पेरणीला ब्रेक बसल्याचे वास्तव आहे. झालेल्या पेरण्या अंकुरल्या असून या उन्हामुळे आणि पाऊस नसल्यामुळे या पेरण्या कोमेजल्या असून ही रोपटी आता करपण्याच्या मार्गावर आली आहेत.
कापूस उत्पादकांवर दुबार, तिबार पेरणीचे सावट
कापूस उत्पादकांचा पट्टा असलेल्या वर्धा जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजावर विश्वास ठेवत जिल्ह्यातील अनेक कापूस उत्पादकांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे लावगड केलेली कपाशी अंकुरली. यानंतर मात्र पावसाने मारलेल्या दडीमुळे उगविलेली कपाशी करण्याचा प्रकार झाला. ज्यांच्या शेतात सिंचनाची सोय होती त्यांनी स्प्रिंकलर व ठिंबक सिंचनाच्या मदतीने पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्यांच्याकडे याची सोय नव्हती अशांवर दुबार आणि आता तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांची कंबर मोडली असून असलेले वातावरण कोरड्या दुष्काळाचे संकेत देत असल्याचे चित्र आहे.
स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांकडून पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांच्याकडून स्प्रिंकलरचा वापर करून पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र ज्यांच्याकडे याची सोय नाही ते शेतकरी आकाशाकडे नजरा लावून आहेत.
सोयाबीनची उतारी कमी होणार ?
सोयाबीन अंकुरल्यानंतर पावसाची गरज आहे. पाऊस आल्यास सोयाबीनची वाढ उत्तम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तीन महिन्याच्या असलेल्या या पिकाला वेळीच पाणी आणि खत मिळाल्यास उत्तम उत्पादन येण्याची शक्यता आहे. यंदा मात्र तसे होणार नसल्याचे संकेत दिसत आहे. पावसाने मारलेल्या या दडीने सोयाबीनची उतारी कमी होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.